शरीराला क्षेत्र असे म्हणतात
अध्याय नववा
क्षेत्र, म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी बाप्पांनी पञ्च भूतानि तन्मात्राऽ पञ्च कर्मेन्द्रियाणि च । अहंकारो मनो बुद्धिऽ पञ्च ज्ञानेन्द्रियाणि च ।। 21 ।। इच्छाव्यत्तं धृतिद्वेषौ सुखदु:खे तथैव च । चेतनासहितश्चायं समूहऽ क्षेत्रमुच्यते ।। 22 ।। हे दोन श्लोक सांगितले. त्यानुसार, आपल्या शरीराला क्षेत्र असे म्हणतात. आपल्या शरीराचा हाडामासाचा गोळा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेला आहे. साहजिकच त्यांच्यापासून तयार झालेल्या आपल्या शरीरावर त्यांची सत्ता असते.
आपल्याला शब्द, रस, स्पर्श, रूप आणि गंध या पंचमहाभूतांच्या वैशिष्ट्यामुळे त्यांच्या सत्तेची जाणीव होते. त्याला तन्मात्रा असे म्हणतात. हात, पाय, लिंग, गुदस्थान व वाणी ही पाच कर्मेंद्रिये व कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ ही पाच ज्ञानेंद्रिये होत. प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या पोटात अहंकार गुप्त असतो. पंचमहाभूतांची गाठ पडली की, स्पष्ट झालेल्या देहाला हा अहंकार चोहोकडे नाचवतो म्हणजे मी कर्ता आहे या भावनेने कर्म करण्यास भाग पाडतो. अंत:करण बुद्धीच्या आधारे जीवाला सुखदु:खाची जाणीव करून देते, बुद्धीला चांगले व वाईट कळते. परा व अपरा असे प्रकृतीचे दोन भाग आहेत. त्या पैकी परा प्रकृतीला अव्यक्त असे नाव आहे. हिला अव्यक्त म्हणायचे कारण म्हणजे पंचमहाभूते व पंचमहाभूतांपासून झालेले प्राण्यांचे देह सूक्ष्म होऊन यात सामावलेले असतात. कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत. बुद्धी ही या पाच इंद्रियांच्या द्वाराने सुखादु:खाची जाणीव करून देते. वाचा, हात, पाय, उपस्थ व गुद हे आणखी पाच इंद्रियांचे प्रकार आहेत. कर्मेंद्रिये ज्यास म्हणतात ती हीच याप्रमाणे दहाही इंद्रिये आपण लक्षात घेतली.
मन हे बुद्धि व अहंकार यांच्यामधील जागेत बळकट होऊन बसलेले असते. वास्तविक पाहिले तर ती एक कल्पनाच आहे. कारण मन हे इंद्रिय दाखवता येत नाही. मन स्वभावाचे मूळ आहे ते सदैव काही ना काही इच्छा करत असते आणि त्या इच्छांच्या पूर्ततेसाठी अहंकाराला अखंड चेतवत असते. इच्छेला वाढवते, आशेला चढवते आणि भयाचे संरक्षण करते. आपण आणि ईश्वर वेगवेगळे आहोत या अज्ञानाला खतपाणी घालते व इंद्रियांना विषयात ढकलते. मन स्वत:च्या कल्पनेने सृष्टि बनवते व विकल्पाने लागलीच मोडते. यामुळे मन गैरसमजाचे कोठार आहे. त्याने बुद्धीचे द्वार झाकले आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे पाच ज्ञानेंद्रियांचे पाच प्रकारचे विषय आहेत.
मागे भोगलेल्या गोष्टीच्या आठवणीने अथवा दुसऱ्याच्या मुखातून ऐकलेल्या शब्दांनी इंद्रिये व विषय यांची भेट होताक्षणीच, विषयांची गोडी असलेले मन, इच्छेचा हात धरून वेगाने उठून धावायला लागते. त्यामुळे जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंड खुपसतात. मनाच्या इच्छेच्या पूर्तीसाठी बुद्धी वेडी होते. इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न झाल्यास द्वेष निर्माण होतो. मनाची इच्छा पूर्ण झाली की, मिळालेल्या सुखामुळे जीव सर्व विसरून जातो.
साक्षीभूत अशा चैतन्याची देहामध्ये जी सत्ता आहे, तिला चेतना हे नाव आहे. ही पायांच्या नखापासून ते मस्तकाच्या केसापर्यंत नेहमी खडखडीत जागी असते. जड शरीरात चैतन्य आणते. पंचमहाभूतांचे एकमेकांशी अजिबात पटत नसल्याने ती एकमेकांना संपवायला टपलेली असतात. अशी पंचमहाभूते एक होऊन देहाच्या रूपाने प्रगट होतात. वैर सोडून एकोप्याने राहतात. इतकेच नाही तर आपल्या गुणाने एक दुसऱ्याला पोषित असतो. ज्यांचे स्वभावत: एकमेकांशी पटत नाही, त्यांची मैत्री ज्या धैर्याच्या योगाने चालते, त्याला धृति असे म्हणतात या सगळ्यांचे मिळून क्षेत्र तयार होते.
क्रमश: