For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहराला जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्याचा मंडळाचा दावा

11:27 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहराला जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्याचा मंडळाचा दावा
Advertisement

मनपा बैठकीत माहिती : दुष्काळ पार्श्वभूमीवर आढावा

Advertisement

बेळगाव : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पाणीपुरवठा महामंडळ, एलअॅण्डटी कंपनी व मनपा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मनपा सभागृहात झाली. या बैठकीत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी 15 जुलैपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याचा दावा केला आहे. महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आयुक्त पी. एन. लोकेश यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. हरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत असून अधिकाऱ्यांना अनेकवेळा सांगूनदेखील सुधारणा होत नसल्याची तक्रार केली. अशोकनगर परिसरात 15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नगरसेवकांनी केली. दरम्यान पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहराला पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी ऑक्टोबरपासूनच नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली. हिडकल व राकसकोपमधील पाण्याची बचत करण्यासाठी मार्कंडेय नदी तसेच लक्ष्मी टेक येथे वाया जाणारे पाणी, याचबरोबर हिंडलगा कारागृह आवारातील विहिरीतून पाणी उपसा करून पाणीपुरवठा करण्यात आला आहे. दररोज 37 एमएलडी पाणी वाचविण्यात आले आहे. सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात 20 फूट पाणी साठा आहे. हा पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एप्रिलनंतर पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. मात्र तत्पूर्वी पाणीसाठा पाहणी करून पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. शहरामध्ये 68 विहिरी, 100 पेक्षा अधिक हातपंपावर चालणाऱ्या कूपनलिका, विजेवर चालणाऱ्या कूपनलिका याद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यावेळी नगरसेवकांनी शहरातील हिंदवाडी, टिळकवाडी, अशोकनगर आदी परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार मांडली.

शहरामध्ये अनेक भागात पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत असल्याने नागरिकांना 7 ते 8 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. असे असले तरी अधिकाऱ्यांकडून चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असल्याने यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतला. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची समस्या निर्माण झाल्यास त्यावर तातडीने उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून चांगल्या प्रकारे काम केले जात आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यासाठी केवळ आरोप न करता एकमेकांच्या सल्ल्यानुसार पाणी समस्या निवारण करणे गरजेचे आहे. यासाठी नगरसेवक, महानगरपालिका व पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांची टीम तयार करून या समस्येवर तोडगा काढला पाहिजे, असे नगरसेवकांनी सांगितले. दरम्यान पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्येक वॉर्डाला टँकर उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले. आवश्यक वेळी टँकर उपलब्ध झाला नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. खोटी माहिती देऊन लोकप्रतिनिधींची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. पाण्याचा दबाव कमी असताना लांबपल्याच्या भागात पाणी सोडले जात आहे. यामुळे अनेक नागरिकांना पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी पाण्याचा पुरवठा करताना दाब पाहून पाणी सोडावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

Advertisement

अधिकाऱ्यांची झडती

पाणी सोडल्यानंतर अर्धातास दूषित पाणी येते. या पाण्याचा नमुना घेऊन अधिकाऱ्यांना तपासणीसाठी देऊन महिना उलटला तरी अहवाल देण्यात आलेला नाही. यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. टेस्टींग मशीन असूनही पाण्याची तपासणी करण्यात दुर्लक्ष होत आहे, अशी तक्रार अनेक नगरसेवकांनी केली. यावरून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली.

Advertisement
Tags :

.