For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चर्चेची ‘आंधळी कोशिंबीर’

06:30 AM Apr 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
चर्चेची ‘आंधळी कोशिंबीर’
Advertisement

अमेरिका आणि इराण यांची ‘शांतता चर्चा’ पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशात होणे, हा एक विनोदच म्हणावयास हवा. त्यामुळे ही चर्चाही सध्या विनोदी पद्धतीनेच होत असल्याचे साऱ्या जगाला पहावयास मिळत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेचे गुऱ्हाळ सध्या चालले आहे. मात्र, या गुऱ्हाळाचा चालक अमेरिका आणि इराण नसून पाकिस्तान आहे. कारण ही चर्चा पाकिस्तानात चालली. पाकिस्तानसारख्या भणंग दहशतवादी देशाची निवड ‘शांतता चर्चे’साठी करण्यात आली, हा मोठा विनोदच आहे. त्यामुळे ही चर्चाही विनोदी पद्धतीनेच चालल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी चर्चेची प्रथम फेरी सपशेल अपयशी ठरली. अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश त्यांच्या भूमिकांशी ठाम राहिल्याने चर्चेचे बारा वाजणार, हे निश्चितच होते. मग दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा झाली. या फेरीसाठी इराणपेक्षा अमेरिकाच अधिक उत्सुक असल्याचे पहावयास मिळाले. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या नेतृत्वात अमेरिकेचे शिष्टमंडळ पाकिस्तानकडे निघाले, अशी वृत्ते प्रसिद्ध झाली. तथापि, इराणचे शिष्टमंडळ आपल्या देशातच बसून होते. होर्मुझची सामुद्रधुनी जोपर्यंत अमेरिका मोकळी करत नाही, तोपर्यंत पाकिस्तानात चर्चेला जाणार नाही, असे इराणने घोषित केल्याने दुसऱ्या फेरीचा प्रारंभ होण्यापूर्वीच ती संपली की काय, असे वाटत आहे. मधल्या काळात ‘एजंट’ पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी अम्sरिकेचा प्रस्ताव घेऊन इराणला आणि इराणचा निरोप घेऊन अमेरिकेला अशा फेऱ्या मारल्या. तथापि, काही साध्य झाल्याचे दिसत नाही. दुसरी फेरी त्रिशंकू अवस्थेत आहे. परिणामी, हा जो पोरखेळ चालला आहे, त्याचा शेवट कसा होणार, हा उत्सुकतेचा विषय आहे. शांतता चर्चा असो, किंवा कोणतीही चर्चा असो, ती यशस्वी व्हायची असेल, तर चर्चा नेमकी कशावर करायची, या संबंधी सर्व बाजूंच्या संकल्पना स्पष्ट असाव्या लागतात. चर्चेतून नेमके काय साध्य करायचे आहे, त्यासंबंधी स्पष्टता असावी लागते. त्याशिवाय चर्चा घडविणारा ‘मध्यस्थ’ हा समंजस, विचारी आणि स्वत:चे असे नैतिक अधिष्ठान असणारा असावा लागतो. पाकिस्तानमध्ये हे तीन गुण तर नाहीतच, शिवाय त्या देशाचे नेतृत्व दुष्टबुद्धीचे आणि कारस्थानी आहे. त्यामुळे ही चर्चा होत तर रहावी, पण तिच्यातून काही भरीव आणि सकारात्मक असे निष्पन्न होऊ नये, असे पाकिस्तानला वाटत असल्यास आश्चर्य वाटावयास नको. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांना चर्चेत अडकवून ठेवून स्वत:चा शक्य तितका हात मारुन घेण्याचा पाकिस्तानचा हेतू नसेलच असे नाही. त्यामुळे मध्यस्थाची भूमिका पाकिस्तानला देणे, म्हणजे कसायाच्या हाती गाय सोपविण्यासारखे आहे. बरे, एवढे होऊन चर्चा झालीच आणि ती वरकरणी यशस्वीही झाल्यासारखे दिसून आले, तरी अमेरिका, इस्रायल आणि इराण यांचा संघर्ष हे प्रकरणच अशा प्रकारचे आहे, की पुन्हा केव्हा भडका उडेल, याची शाश्वती नाही. सध्या अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश एकमेकांवर चिखलफेक करण्यात मग्न आहेत. परस्परविरोधी विधानांचा तर वर्षाव होत आहे. त्यामुळे आज सकाळची भूमिका दुपारपर्यंत राहील, याची शाश्वती नाही आणि संध्याकाळी काही वेगळेच घडू शकते, अशी स्थिती आहे. मधल्यामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी नामक एका चिंचोळ्या समुद्री मार्गाचा गळा घोटला जात आहे. त्यामुळे या मार्गातून होणाऱ्या इंधन आणि इतर व्यापाराचा श्वास गुदमरला आहे. या मार्गातून इंधनाची आयात करणाऱ्या देशांचीही केंडी होत आहे. तशातच पाकिस्तान हा देश दोन्हीकडे गळ टाकून बसला आहे. ही मध्यस्थाची भूमिका पाकिस्ताने काही हा वाद सुटावा आणि जगाचा लाभ व्हावा यासाठी स्वीकारलेली नाही. त्या देशाला आपला स्वार्थ साधून घ्यायचा आहे, हे स्पष्ट आहे. शिवाय, पाकिस्तान हे सर्व स्वत:च्या बुद्धीने करत आहे, की त्याच्यामागे कोणी बलाढ्या ‘बोलविता धनी’ आहे, याविषयीही स्पष्टता नाही. चीन हा देश पाकिस्तानचे प्यादे पुढे करुन शस्त्रसंधी घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी वृत्ते मध्यंतरीच्या काळात पसरली होती. तथापि, खरे काय आणि खोटे काय, हे समजावयास मार्ग नाही. एकंदर, हा चर्चेचा कार्यक्रम म्हणजे ‘आंधळी कोशिंबीर’ बनला आहे. दुसरीकडे अमेरिकेत इस्रायल आणि लेबेनॉन यांच्यात प्रत्यक्ष चर्चा घडविण्याचा घाट घातला जात आहे. त्या चर्चेची एक फेरीही झाली असून तीही अयशस्वी ठरली आहे. या दोन्ही देशांनी परस्परांवर हल्ले करण्याचे सत्र चालविले आहेच. इस्रायलने लेबेनॉनचा काही भाग ताब्यात घेतल्याचेही वृत्त आहे. लेबेनॉनमध्ये इराण समर्थित हिजबुल्ला ही दहशतवादी आणि इस्रायलविरोधी संघटना कार्यरत आहे. ती जोपर्यंत आहे, तो पर्यंत ती इस्रायलला शांततेत राहू देणार नाही. त्यामुळे त्या आघाडीवर कधी दीर्घकालीन शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता नाही. अशा प्रकारे या एकंदर संघर्षाशी ज्यांचा थेट संबंध आहे, त्या देशांचे पाय एकमेकांमध्ये अडकल्याचे दिसून येते. अशा स्थितीत सकारात्मक काही घडेल अशी अपेक्षा ठेवणेच मूर्खपणाचे ठरेल. या प्रकरणात पाकिस्तानची जी ‘दुहेरी निती’ आहे ती इराणने काही प्रमाणात ओळखली आहे असे वाटते. कारण इराणने नुकताच पाकिस्तानवर अमेरिकेची बाजू घेतल्याचा आरोप केला आहे. एकंदरीतच, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध या गंभीर विषयाचा अक्षरश: विचका करण्यात आला आहे. समंजसपणाचा अभाव, हेच याचे प्रमुख कारण आहे. इराणच्या आजूबाजूचे अरब देश धास्तावलेल्या स्थितीत हा सर्व खेळ पहात आहेत.  यातच भर म्हणून इंधन दराने 100 डॉलर प्रतिबॅरलची पातळी पुन्हा ओलांडली असून जगभरात पेट्रोल आणि डीझेल यांचे दर भडकले आहेत. त्यामुळे जगाला प्रतीक्षा आहे हे युद्ध थांबण्याची आणि व्यापारी जलमार्ग मोकळा होण्याची. ती काही लवकर पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे आता ऊर्वरित जगाने एकत्र येऊन इंधनपुरवठ्यासाठी पर्यायांचा शोध युद्धपातळीवर घेण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

शिरोभाग :

Advertisement
Advertisement
Tags :

.