बिश्नोई बंधूंची अस्तित्वासाठी धडपड !
टपोरी टोळी असलेल्या बिश्नोई गँगचे दोन्ही कर्ते-धर्ते कारागृहात खितपत पडले आहेत. यामुळे बिश्नोई गँगचे नामोनिशान संपल्यात जमा आहे. अशी जाणीव झालेल्या बिश्नोई बंधूंनी प्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक असलेल्या रोहित शेट्टीवर केलेला गोळीबार म्हणजे अस्तित्वासाठीची धडपड होय.
प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर काही तासातच सोशल मीडीयावर या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली. अभि भी हम जिंदा है.. हे दाखविण्यासाठी म्हणजेच स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ही बिश्नोई गँगची धडपड आहे, हे काही लपून राहिले नाही. सातत्याने प्रकाशझोतात राहण्यासाठी बिश्नोई गँग अशा प्रकारचे उपदव्याप करीत असते. बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या मागचा ससेमिरा काही प्रम़ाणात कमी केल्यानंतर बिश्नोई गँगने माजी दिवंगत राज्यमंत्री बाबा सिद्धीकी यांची हत्या करीत संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडविली होती. मात्र यावेळी मुंबई क्राईम ब्रँचने बिश्नोई गँगची पूर्ण हवा काढत त्यांच्या अनेक साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणानंतर अनमोल बिश्नोई याला अमेरिकेत अटक केल्यानंतर काही दिवसांत त्याला देशात आणले. तर दुसरीकडे लॉरेन्स हा साबरमती कारागृहात पहिल्यापासून आहे. बिश्नोई बंधू दोघेही कारागृहात असल्याने बिश्नोई बंधू आणि त्यांची गँग संपली, असे स्वत: बिश्नोई बंधूंना देखील वाटू लागल्याने त्यांनी रोहित शेट्टीच्या घराबाहेर केलेला गोळीबार म्हणजेच अस्तित्वासाठीची धडपड होय.
प्रसिद्धीचे वलय असलेल्या व्यक्ती अथवा संस्थेवर धावा बोलले की त्यांची चांगलीच प्रसिद्धी मिळते आणि दहशत निर्माण होते. हे बिश्नोई बंधूंना चांगलेच अवगत आहे. त्याची सुऊवातच त्यांनी पंजाबमधून केली. जगातील अनेक देशांमध्ये आपल्या रॅपर पंजाबी गाण्याने भुरळ पाडणाऱ्या सुभाषसिंग बलकौरसिंग उर्फ सिद्धू मुसेवाला याची भरदिवसा अत्याधुनिक शस्त्राने गोळ्या झाडून हत्या केली होती. सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यामागे नेमका हेतू काय होता? हे अद्याप समजले नाही. सिद्धू मुसेवाला हा केवळ गायक नसून, तो राजकारणी देखील होता. या हल्याची जबाबदारी तिहार कारागृहात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई आणि कॅनडामध्ये स्थायिक असलेल्या गोल्डी ब्रार यांनी घेतली. येथूनच बिश्नोई गँग बऱ्यापैकी देशात नावाऊपाला आली. सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा तपास सुऊ असतानाच बॉलिवूडमध्ये दबंग अभिनेता अशी ओळख असलेल्या सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा उपदव्याप बिश्नोई गँगने केला. एवढेच नाही तर सलमानच्या घराबाहेर गोळीबार देखील करण्याचा पराक्रम केला. एकक्षण असे वाटले की बिश्नोई गँगच्या खांद्यावर बंदुक ठेवून अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रीय तर होत नाही ना? कारण बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांचा संबंध फार जुना आहे. बॉलिवूडमध्ये अनेकदा गँगवॉर, हत्यासत्र, धमकी, खंडणी तसेच ब्लॅक मनी गुंतविल्याचे प्रकार समोर आले आहेत. मुंबईत अंडरवर्ल्ड चरणसीमेवर असताना दाऊदने दुबईत बस्तान बसविले होते. दुबईत राहून तो मुंबईवर राज करीत होता. त्याची एवढी दहशत होती की, बॉलिवूडसुद्धा त्याच्या इशाऱ्यावर उघडपणे नाचत होते. 1992 च्या पूर्वी अनेक अभिनेते देखील दाऊदचा पाहुणचार घेण्यासाठी दुबईत जात होते. दाऊदला कोणतीही अभिनेत्री आवडली तर तो तीला तत्काळ दुबईला बोलावून घेत असे. यामध्ये मंदाकिनी या अभिनेत्रीचे नाव अनेकदा चर्चेत होते.
कधी दाऊदचा तर कधी त्याचा भाऊ अनिसचा वाढदिवस तर कधी भावाचे लग्न यासाठी त्याने अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना दुबईत बोलावून घेतले होते. या सर्वांचे व्हिडीओ तसेच फोटो आजही क्राईम ब्रँचकडे आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दाऊदचा शब्द प्रमाण मानला जात होता. मिथून चक्रवर्ती, संजय दत्त, फिरोज खान, जॉनी लिव्हर, आदित्य पंचोली, अनिता आयुब, अनिल कपूर, असरानी, मजहार खान हे सर्व अभिनेते 1992 पूर्वी दाऊदच्या खूप जवळ होते. एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला चित्रपटात काम द्यायचे असेल तर दाऊदच्या एका फोनवर त्यांना काम मिळत होते. एवढी दहशत दाऊदची त्याकाळी होती. जर दाऊदचे कोणी ऐकले नाही तर येणाऱ्या काही दिवसातच त्याचा ‘पोटला’ (हत्या) केला जायचा. यामुळे दाउदला कोणी नाही म्हणण्याची हिंमत करीत नसे. ज्याप्रमाणे, दाऊदची दहशत बॉलिवूडमध्ये होती, अगदी त्याचप्रकारची दहशत छोटा राजनने देखील करण्यास सुऊवात केली होती. याकरीता त्याने अनेक आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांना खंडणीसाठी धमकाविले होते.
एवढेच नाही तर सध्या पॅरोलच्या मागे लागलेला गँगस्टर अबू सालेमने देखील बॉलिवूडमध्ये आपली दहशत निर्माण केली होती. बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमाविण्यासाठी आलेल्या मोनिका बेदीशी त्याने लग्नदेखील केले होते. तर काहींनी बॉलिवूडमधील आपले स्पर्धक संपविण्यासाठी अनेकदा अंडरवर्ल्डची मदत देखील घेतली आहे. गुलशन कुमारमुळे आपले अस्तित्व धोक्यात आहे, याची जाणीव झालेल्या नदीम याने अबू सालेमला गुलशन कुमार हत्येची सुपारी दिली होती. सालेमने 12 ऑगस्ट 1997 साली अंधेरी येथील चार बंगला परिसरात असणाऱ्या शिवमंदिरासमोर गुलशन कुमार यांची हत्या केली होती. या हत्येमुळे संपूर्ण बॉलिवूड जगत हादऊन गेले होते. तर छोटा शकिलने आर्थिक व्यवहारावऊन चित्रपट निर्माते मुकेश दुग्गल यांची हत्या केली होती. अशा प्रकारचे अनेक हत्याकांड तसेच गँगवॉरचे बळी हे बॉलिवूड ठरले आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या रवि पुजारीने देखील चित्रपट निर्माते महेश भट्ट यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही तर महेश भट्ट यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या तब्बल 13 जणांना राकेश मारीया पोलीस आयुक्त असताना अटक करण्यात आली होती.
वास्तविक पाहता, अशी अनेक उदाहरणे अथवा घटना आहेत, ज्यामध्ये बॉलिवूड अनेकदा अंडरवर्ल्डचे बळी पडले आहेत. अगदी त्याचप्रमाणे, आताही तेच घडतेय की काय? अशी शंका येण्यास सुऊवात झाली होती. मात्र हा सर्व खटाटोप बिश्नोई गँगने स्वत:च्या अस्तित्वासाठी केलेली धडपड असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे. कारण यापूर्वी रोहित शेट्टीला ना धमकी आली ना कोणाचा फोन अचानक गोळीबार झाल्याने बॉल़िवूड विश्व हादरले आहे. मात्र प्राथमिक तपासात बिश्नोई गँगची स्वत:च्या अस्तित्वासाठीची धडपडच वाटते आहे.
अमोल राऊत