For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी

06:13 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी
Advertisement

शेकडो कॅमेरे अन् पोलीस सुरक्षा असूनही 400 किलो सोने गायब : सर्व आरोपी भारतीय वंशाचे

Advertisement

वृत्तसंस्था/ .टोरंटो

भारत आणि कॅनडा यांचे संबंध ताणले असतानाच एक मोठी घटना घडली आहे. कॅनडामध्ये देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी घडली आहे. या चोरीत काही भारतीय युवकांचा हात असल्याचा आरोप आहे. कॅनडाच्या पोलिसांनी 36 वर्षीय भारतीयाला अटक केली आहे. तर 5 अन्य भारतीयांचा शोध घेतला जात आहे. फिल्मी स्टाइलमध्ये टोरंटो विमानतळावर ही चोरी झाली आहे. कडेकोट सुरक्षा असतानाच 400 किलोग्रॅम सोने आणि 2.5 दशलक्ष कॅनेडियन डॉलर्सची चोरी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Advertisement

चोरीची ही घटना 17 एप्रिल रोजी घडली होती. 400 किलोग्रॅम सोन्याने भरलेल्या कंटेनरमध्ये 25 लाख कॅनेडियन डॉलर्स इतकी रक्कम देखील होती. सुरक्षित स्टोरेज फॅसिलिटीमधून ही चोरी करण्यात आली आहे. पूर्ण प्रकार बनावट दस्तऐवजांच्या मदतीने करण्यात आला. हा कंटेनर स्वीत्झर्लंडच्या झ्यूरिच विमानतळावरून टोरंटो विमानतळावर आणला गेला होता. कंटेनरला कार्गोतून उतरवून कॅमेरे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी युक्त स्टोरेजमध्ये जमा करण्यात आला होता. तर दुसऱ्या दिवशी कंटेनर सोने आणि रोख रकमेसहित गायब असल्याचे पोलिसांना कळले होते.

एक भारतीय अटकेत

कॅनडा पोलिसांनी 6 मे रोजी भारतातून टोरंटो विमानतळावर दाखल झालेल्या अर्चित ग्रोव्हरला अटक केली आहे. त्याच्यावर या चोरीत सामील असल्याचा आरोप आहे. यापूर्वी कॅनडा पोलिसांनी अर्चितच्या विरोधात वॉरंट जारी केले होते. अर्चितला यापूर्वी देखील 5 हजार कॅनेडियन डॉलर्सच्या चोरीच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्या विरोधात अमेरिकेत देखील चोरीचा गुन्हा नोंद आहे.

अन्य आरोपींचा शोध

याप्रकरणी अन्य आरोपींचा शोध घेतला आहे. अमाद चौधरी, अली रजा, प्रसाद  परामलिंगम यांना मागील महिन्यात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. तर परमपाल सिद्धू आणि अमित जलोटा यांचा शोध सुरू आहे. याचबरोबर कॅनडाच्या मिसीसाउगा येथील रहिवासी अर्सलान चौधरी आणि ब्रॅम्पटनचा रहिवासी सिमरन प्रीत पनेसरच्या शोधाकरता वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे दोघेही चोरीच्या घटनेवेळी एअर कॅनडासाठी काम करत होते. एअर कॅनडाच्या दोन माजी कर्मचाऱ्यांनी चोरीच्या घटनेत मदत केल्याची कबुली दिली.

1 किलो सोने हस्तगत

एका आरोपीच्या घरातून 1 किलो सोने तसेच 4.34 लाख कॅनेडियन डॉलर्स इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सर्व आरोपींची ओळख पटविण्यात आली असून त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करत शोध घेतला जात असल्याचे पोलिसांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.