सायकल फेरीतून मराठी भाषिकांची एकजूट दाखविणार
शहापूर विभाग म. ए. समितीचा निर्धार : नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शहापूर विभागाची बैठक मंगळवारी सिद्धिविनायक गणेश मंदिर, रामलिंगवाडी येथे पार पडली. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व कोरे गल्लीचे माजी पंच शिवाजी हावळाण्णाचे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. 1 नोव्हेंबर रोजी काळा दिनाची सायकल फेरी काढून मराठी भाषिकांची एकजूट दाखविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. सायकल फेरीमध्ये सहभागी झालेल्या सीमावासियांनी कोणत्याही वेगळ्या घोषणा न देता अत्यंत शांततेत ही फेरी काढावी. तसेच सर्वोच्च न्यायालयात आम्हाला निश्चितच न्याय मिळेल. तोपर्यंत सर्वांनी एकजुटीने लढण्याचे आवाहन शिवाजी हावळाण्णाचे यांनी केले.
या बैठकीमध्ये सीमाप्रश्न तसेच म. ए. समितीवर तोंडसुख घेतलेल्या खासदार जगदीश शेट्टर यांच्या वक्तव्याचा निषेध ठराव मांडण्यात आला. व्यासपीठावर माजी नगरसेवक नेताजी जाधव, राजकुमार बोकडे, शशिकांत सडेकर उपस्थित होते. गजानन शहापूरकर, राहुल बोकडे, रवी जाधव, रणजित हावळाण्णाचे यांनी मनोगत व्यक्त केले. नेताजी जाधव यांनी मूक फेरीला शहापूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी बंडू पाटील, मनोहर शहापूरकर, राजू नेसरीकर, रवींद्र पवार, रजत बोकडे, उमेश भातकांडे, ओमकार शिंदे, शिवाजी उचगावकर, प्रकाश बिर्जे, सतीश गडकरी, कुणाल कोचेरी यासह इतर सदस्य उपस्थित होते.