अनुकूल परिस्थितीत योगसाधना करणारा श्रेष्ठ
अध्याय पाचवा
माणसाने वैयक्तिक नाही पण लोककल्याणकारी कार्यासाठी जरी संकल्प केले तर त्यांच्या पूर्तीसाठी मनुष्य झटू लागतो. त्याने केलेला संकल्प पूर्ण झाला तर त्या पूर्तीतून आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं, मान द्यावा अशा अपेक्षाही डोकं वर काढतात. तसेच काहीवेळा संकल्प आणि पूर्तीत अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यांच्या निवारणाचा मनुष्य जसजसा विचार करतो तसतसे त्या अडथळ्यांच्या अनुरोधाने त्याच्या मनात मित्रत्व, शत्रुत्व, उध्दार, बंधन आदि विचार येऊ लागतात. ह्या अर्थाचा
सुहृत्वे च रिपुत्वे च उद्धारे चैव बन्धने ।
आत्मनैवात्मनो ह्यात्मा नात्मा भवति कश्चन ।। 4।।
हा श्लोक आपण पहात आहोत. लोककल्याणकारी कार्य करत असताना काही लोकं मदत करतात तर काही विरोधात जातात. त्यामुळे आपोआपच मित्र, शत्रू तयार होतात. त्यांच्याबद्दल मनात विचार येऊन त्याचे मन अस्वस्थ होऊ शकते. तसेच अपेक्षा बाळगल्याने संकल्पपूर्ती करण्याच्या नादात, मनुष्य समदृष्टी गमावून बसतो. परिणामी पापपुण्याचा संचय होतो आणि बंधनात अडकतो. म्हणून कर्मयोग्याने कोणताही संकल्प न करता जेव्हढं कार्य त्याच्या हातून व्हावं अशी ईश्वरी इच्छा असेल तेव्हढंच कार्य त्याच्या हातून होईल हे लक्षात घेऊन, निरपेक्षतेनं कार्य करून स्वत:चा उध्दार करून घ्यावा. पुढील श्लोकात बाप्पा कर्मयोगी व्यक्तीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या समदृष्टीबद्दल सांगत आहेत.
मानेऽपमाने दु:खे च सुखेऽसुहृदि साधुषु ।
मित्रेऽमित्रेऽप्युदासीने द्वेष्ये लोष्ठे च काञ्चने ।। 5।।
समो जितात्मा विज्ञानी ज्ञानीन्द्रियजयावह:।
अभ्यसेत्सततं योगं यदा युक्ततमो हि स: ।। 6 ।।
अर्थ- मान, अपमान, दु:ख, सुख, असाधु, साधु, मित्र, शत्रु, उदासीन, द्वेषाला योग्य मनुष्य, मातीचे ढेकूळ, सुवर्ण यांचे ठिकाणी समान बुद्धी झालेला, अंत:करण जिंकलेला, अनुभवयुक्त ज्ञान असलेला, ज्ञानी, इंद्रिये जिंकलेला असा मनुष्य जेव्हा सतत योगाचा अभ्यास करतो तेव्हा तो श्रेष्ठ योगी होतो.
विवरण-समदृष्टी बाळगण्यासाठी भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायात सांगितलेला ईश्वराचा दिव्ययोग समजून घेणं आवश्यक आहे. त्यातील चौथ्या व पाचव्या श्लोकात भगवंत म्हणतात,
मी चि अव्यक्त-रूपाने जग हे व्यापिले असे ।
माझ्यात राहती भूते मी न भूतांत राहतो ।। 4 ।।
न वा भूते हि माझ्यात माझा हा दिव्य योग की ।
करितो धरितो भूते परी त्यात नसे कुठे ।।5 ।।
मतितार्थ असा की, सर्व भुते भगवंतांच्यात समाविष्ट आहेत किंवा सर्वच जर भगवंतांनी व्यापलंय तर इतरांना जागाच नाही म्हणजेच दिसणारी सर्व भुते केवळ भासमान आहेत, म्हणजे केवळ आहेत असं वाटतं पण प्रत्यक्षात काहीच अस्तित्वात नसतं. इथं मृगजळाचं उदाहरण लक्षात घेता येईल तेथे पाणी आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात काहीच नसतं. असं जर आहे तर भेदाभेदाला स्थानच रहात नाही. म्हणून सर्व व्यक्ती व त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांच्याकडे समदृष्टीने पाहणे योग्य आहे. समदृष्टीने पाहणे ह्याचा अर्थ उलगडून सांगताना श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते निरपेक्षतेने करणे. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसली तरच हे शक्य होते. तसे केल्याने आपले कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधानही साधकाला मिळते.
अशा कर्मयोग्याने इंद्रियजय साधलेला असतो. तो अनुभवयुक्त ज्ञानाने समृद्ध असतो. समाजात होणारा मान, अपमान ह्या सर्व गोष्टी पूर्वकर्मानुसार घडत आहेत हे लक्षात घेऊन तो दोन्हीही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सोने, माती ह्या गोष्टी त्याला सारख्याच निरर्थक वाटत असतात. योगसाधनेला त्यांची मन:स्थिती अनुकूल झालेली असते अशा परिस्थितीत सततच्या योगसाधनेमुळे तो श्रेष्ठ योगी होतो.
क्रमश: