आरक्षणाचा लाभ सीमाभागालाही व्हावा
सीमाभागातही एकजूट दाखवा : बेळगाव सकल मराठा समाजाच्यावतीने विजयोत्सव
बेळगाव : महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. महाराष्ट्राच्या राजधानीत मराठा समाजाची झालेली एकजूट पाहून महाराष्ट्र सरकारला आरक्षणासंबंधीचा अध्यादेश काढावा लागला. हीच एकजूट मराठा समाजाने सीमाभागातही दाखवावी, असे प्रतिपादन सकल मराठा समाज बेळगावचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी केले. रविवारी बेळगाव सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी उद्यान येथे विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेळगाव सकल मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूल, ता. गडहिंग्लज येथील भगवानगिरी महाराज व रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सीमाभागातील मराठा समाज एकवटला होता.
सीमाभागातील मराठ्यांना आरक्षणाची गरज
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणासंबंधीचा अध्यादेश जारी केला. या आरक्षणाचा फायदा बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील मराठा समाजाला देखील होणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. मराठा समाज हा शेती व पूरक व्यवसायांवर अवलंबून असल्याने या समाजाची तितकिशी प्रगती झाली नाही. यासाठी शिक्षण, नोकरी यामध्ये आरक्षण मिळाल्यास समाजाची प्रगती होण्यास मदत होणार आहे.
जरांगे-पाटील यांना बेळगाव भेटीचे आमंत्रण देणार
‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणांनी छत्रपती शिवाजी उद्यान परिसर दणाणून निघाला. ‘जरांगे-पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ असे म्हणत जरांगे-पाटील यांना बेळगाव भेटीचे आमंत्रण दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मराठा समाज व सीमाभागातील मराठी भाषिक हे दोन्ही एकच दुवे असून यापुढे समाजाच्या समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निश्चय करण्यात आला. यावेळी नेते प्रकाश मरगाळे, महादेव पाटील, शंकर बाबली, आर. एम. चौगुले, अॅड. अमर येळ्ळूरकर, सुनील जाधव, चंद्रकांत कोंडुस्कर, गणेश द•ाrकर, गुणवंत पाटील, अंकुश केसरकर, शिवाजी हावळाण्णाचे, संजय मोरे, प्रा. आनंद आपटेकर, सागर पाटील, शिवानी पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते.