For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपूर्व उत्साहात बेकवाड लक्ष्मी यात्रेची सांगता

10:11 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
अपूर्व उत्साहात बेकवाड लक्ष्मी यात्रेची सांगता
Advertisement

मिरवणुकीत भंडाऱ्याची उधळण, सर्वत्र उदो उदोचा जयघोष, हजारो भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक

Advertisement

वार्ताहर /नंदगड

बेकवाड (ता. खानापूर) येथील लक्ष्मीदेवीची बुधवार दि. 6 रोजी यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने परिसरातील दोन्ही लक्ष्मीदेवींची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो भाविक देवीची मिरवणूक पाहण्यासाठी उपस्थित होते. बेकवाड येथे एक सिंहावर बसलेली तर दुसरी वाघावर बसलेली लक्ष्मीदेवीची मूर्ती आहे. दोन्ही लक्ष्मीदेवीचा विवाह एकाचवेळी होतो. त्यानंतर यात्रोत्सवाच्या ठिकाणी दोन्ही लक्ष्मी एकाच ठिकाणी गदगेवर बसविल्या जातात. या ठिकाणी मोठा यात्रोत्सव झाला. हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. ओट्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. बुधवारी शेवटचा दिवस असल्याने धार्मिक कार्यक्रमानंतर सायंकाळी 5 वाजता दोन्ही लक्ष्मीदेवीच्या मूर्तीना गदगेवरून बाहेर आणून गदगा मंडपासभोवती पाच फेरे काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा मिरवणूक काढण्यात आली. मातंगी झोपडीसभोवती पाच फेरे काढण्यात आले. त्यानंतर झोपडीला आग लावण्यात आली. पुढे मिरवणूक गावच्या पूर्वेला असलेल्या कलमेश्वर मंदिराकडे गेली. तेथे मंदिरासभोवती पुन्हा पाच फेरे काढण्यात आले. सायंकाळी सातनंतर देवीचे सीमेकडे प्रस्थान झाले. दोन्ही लक्ष्मीदेवींच्या मिरवणुकीसाठी दोन डोलारे बनविण्यात आले होते. लांब बांबू बांधण्यात आले होते. 30 ते 40 युवक प्रत्येक लक्ष्मीला खांद्यावर घेऊन नाचवत व फिरवत होते. वाद्याच्या गजरात तरुणाई नृत्य करत होती. देवीवर भंडारा उधळला जात होता. भव्य मैदानात लोकांनी देवीच्या मिरवणुकीचे दृश्य पाहिले. तर काही लोक घरांच्या स्लॅबवर, छतावर बसून देवीचे दर्शन घेत होते. 18 वर्षानंतर भरलेल्या लक्ष्मीदेवी यात्रेला पै-पाहुणे, माहेरवासीनी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.