For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खडतर परीक्षेस सुरुवात...

09:53 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
खडतर परीक्षेस सुरुवात
Advertisement

इगोर स्टीमॅच यांना वादग्रस्त पद्धतीनं भारतीय फुटबॉल संघाचं प्रशिक्षकपद सोडावं लागल्यानंतर ती धुरा स्वीकारली ती स्पॅनिश मानोलो मार्केझ यांनी...आधीच सुनील छेत्रीची उणीव चमूला भेडसावतेय. त्यात त्यांचा डाव सुरू झालाय तो ‘इंटरकाँटिनेन्टल कप’मधील दारुण कामगिरीपासून...हे कमी म्हणून की काय त्यांच्या ताब्यात असलेल्या ‘एफसी गोवा’ची ‘आयएसएल’मधील सुरुवात देखील निराशाजनक ठरलीय...या दोन्ही आघाड्यांवर त्यांच्या कौशल्याची कसोटी लागेल हे स्पष्टपणे दिसतंय...

Advertisement

‘त्या’नवनियुक्त भारतीय प्रशिक्षकाला ‘इंटरकॉन्टिनेन्टल चषक’ स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत जागतिक क्रमवारीत पहिल्या 170 देशांत सुद्धा स्थान नसलेल्या हिंदी महासागरातील इवल्याशा मॉरिशसनं गोलशून्य बरोबरीत रोखून पहिला धक्का दिला...त्यानंतर सीरियानं ‘त्यांच्या’ संघाचे 3-0 असे तीन तेरा वाजविले...किमान ‘इंडियन सुपर लीग’ (आयएसएल) स्पर्धेच्या जमशेदपूरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ‘त्यांचा’ ‘एफसी गोवा’ स्वत:च्या भूमीवर विजयाची चव चाखून कसर भरून काढेल असं वाटलं होतं. परंतु पूर्वीच्या भारतीय हॉकी संघाप्रमाणं शेवटच्या क्षणाला गोल खाण्याचा रोग लागलेल्या यजमान संघावर धक्कादायक 1-2 असा पराभव स्वीकारण्याची पाळी आली...मग निराश झालेल्या ‘त्या’ प्रशिक्षकानं वेळ न गमावता मैदान सोडलं...स्पेनचे मानोलो मार्केझ...

मानोलो हे राष्ट्रीय संघ आणि एखाद्या क्लबचं प्रशिक्षकपद एकाच वेळी भूषविणारे पहिलवहिले विदेशी प्रशिक्षक ठरलेत. 31 मे, 2025 पर्यंत ‘एफसी गोवा’चे प्रशिक्षक म्हणून नेमणूक झालेल्या या स्पॅनिश व्यक्तीलाच अखिल भारतीय फुटबॉल महासंघानं (एआयएफएफ) राष्ट्रीय संघाची सूत्रं सोपविण्याकरिता पसंती दिलीय. तीन वर्षांपैकी एक वर्ष त्यांना दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्याची परवानगी देण्यात आलीय अन् येऊ घातलेल्या जून महिन्यापासून ते फक्त भारताच्या खेळाडूंना मार्गदर्शन करतील...‘एफसी गोवा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पुष्कर म्हणतात, ‘आम्हाला नेहमीच भारतीय फुटबॉलविषयी आस्था राहिलीय नि म्हणूनच त्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. कुठल्याही खेळाडूच्या प्रगतीला सुद्धा रोखण्याचा आम्ही कधीही प्रयत्न केलेला नाहीये’...

Advertisement

सध्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची माजी प्रशिक्षक इगोर स्टीमॅच यांच्याशी दोन वर्षं बाकी असताना कुठलंही कारण न देता प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केल्याबद्दल झुंज चालू असून इगोरनी शिल्लक सहा कोटी रुपये देण्याची जोरदार मागणी केलीय. या पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या ‘एआयएफएफ’वरचा दबाव मानोलो मार्केझची निवड केल्यामुळं बराचसा कमी होईल...55 वर्षीय मानोलोंनी या भूमीला स्पर्श केला तो 2020 साली हैदराबाद एफसी’चे प्रशिक्षकपद सोडलेल्या आल्बर्ट रॉका यांचं स्थान घेण्यासाठी. कारण रॉका यांची बार्सिलोनाचे तंदुरुस्ती प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती...

स्पॅनिश प्रशिक्षकांनी वेळ न गमावता आपल्या मोहिमेला प्रारंभ केला व शेवटचं स्थान वाट्याला आलेल्या क्लबला फक्त दोन वर्षांत सर्वोच्च क्रमांकावर पोहोचविलं. हैदराबाद एफसी’नं 2022 सालचा ‘आयएसएल चषक’ आपल्या खात्यावर जमा केला...आता त्यांना फार मोठी जबाबदारी देण्यात आलीय ती खेळाडूंच्या गुणांना व्यवस्थित खतपाणी घालण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळंच...‘माझ्या दृष्टीनं भारतीय संघाचं प्रशिक्षकपद भूषविण्याची संधी मिळणं हा फार मोठा बहुमान. कारण मी भारतला माझं दुसरं घर मानलंय. हा देश आणि येथील लोकांशी माझे छान सूर जुळलेत. या भूमीवर पाय ठेवल्यापासून मी स्वत:ला त्यांच्यापैकी एक समजू लागलोय. मला लाखो चाहत्यांना भरभरून आनंद द्यायचाय. मी ‘एफसी गोवा’चा सुद्धा त्यांनी मला राष्ट्रीय संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारण्याची संधी दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे’, मार्केझ यांचे शब्द...

मानोलो यांनी भारतीय संघाला प्रशिक्षण देण्यासाठी तीन वर्षांचा करार केलाय. जर भारत ‘एशियन कप’साठी पात्र ठरला, तर त्यांच्या करारात वाढ होणार हे सांगण्यासाठी एखाद्या ज्योतिषाची गरज नाहीये...खरं गेल्या मोसमात ‘मोहन बागान सुपर जायंट’ला ‘आयएसएल शिल्ड’ जिंकून देणारे आणि भारताच्या भूमीवर अत्यंत यशस्वी ठरलेले आंतोनियो लोपेझ हबास यांचाही निवड समितीनं विचार चालविला होता. पण त्या 67 वर्षीय व्यक्तीचं आरोग्य त्यांच्या नेमणुकीच्या आड आलं...

दुहेरी भूमिकेत काम करणारे मानोला हे पहिलेवहिले विदेशी प्रशिक्षक असले, तरी यापूर्वी सुखविंदर सिंग, पी. के. बॅनर्जी, नईमुद्दीन, आर्मांदो कुलासो यांनीही अशा पद्धतीनं काम केलंय...आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील असं चित्र काही वेळा पाहायला मिळालंय. दिग्गज विदेशी प्रशिक्षक सर अॅलेक्स फर्ग्युसन यांनी 1985 साली ‘एबर्डीन’ व स्कॉटलंड यांचं प्रशिक्षकपद एकाच वेळी सांभाळलं होतं, तर हिडिंक यांनी 2005-06 मोसमात हॉलंडच्या ‘पीएसव्ही आयंडोव्हॅन’ नि ऑस्ट्रेलिया अन् 2009 साली रशिया व ‘चेल्सी’ यांच्या प्रशिक्षकपदाचा भार पेलला होता. डिक अॅडव्होकाट यांनीही ‘एझेड अल्कमार’ व बेल्जियम यांना आपल्या अनुभावाचा डोस 2009 मध्ये पाजला होता...

आता मानोलो मार्केझ यांच्यापुढं जबाबदारी आहे ती व्हिएतनाम आणि लेबॅनॉन यांचा समावेश असलेल्या नि व्हिएतनाममध्ये ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या स्पर्धेत भारताचा ध्वज फडकावण्याची. पण खऱ्याखुऱ्या कसोटीला तोंड द्यावं लागेल ते 2025 सालच्या मार्च महिन्यात. कारण 2027 सालच्या ‘एशियन कप’साठी पात्रता फेरीचे सामने त्यावेळी सुरू होणार!

भारतीय संघाच्या जबाबदारीविषयी काय वाटतंय मार्केझना?...

  • ‘चार वर्षं भारतात वास्तव्य केल्यानंतर मला एक छान संधी मिळालीय ती आणि त्या आव्हानाचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन...भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी तब्बल 291 प्रशिक्षकांनी अर्ज केला होता हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण जेव्हा एखाद्या राष्ट्रात प्रशिक्षकाची निवड होते तेव्हा समितीच्या मनात जास्त नावं नसतात. कदाचित भारतात अनुभव घेऊन पाहण्याचा इच्छुकांचा मनसुबा असावा’...
  • ‘क्लब आणि देश यांचं एकाच वेळी प्रशिक्षकपद पेलणं म्हणजे काही फार मोठी गोष्टी नव्हे. असं पहिल्यांदा घडलेलं नाही अन् यापुढंही घडणारच...मी राष्ट्रीय संघासाठी चांगल्या दर्जाच्या खेळाडूंचीच निवड करणार. त्यावेळी ते माझ्या संघातून खेळतात की नाही याचा अजिबात विचार करणार नाहीये. आम्ही जर योग्य दिशेनं पाऊल टाकलं, तर यश फारसं दूर नाही’...
  • ‘माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत, पण सुनील छेत्रीच्या गैरहजेरीत त्यांना मूर्त रूप देणं अतिशय कठीण. छेत्री हा एक महान खेळाडू होता’...
  • ‘स्टीमॅचसंबंधीचा प्रश्न म्हणजे फार मोठा आव्हान नव्हे. कारण असं प्रत्येक राष्ट्रात घडलंय आणि भारत त्याला अपवाद नाहीये...‘आय लीग’मधील खेळाडूंची मी निवड करणार की नाही हे आताच सांगणं शक्य नाहीये. तसं पाहिल्यास सध्या खेळणाऱ्या संघांची संख्या खूप कमी. ती किमान 16 ते 20 असायला हवी. त्यामुळं खेळाडू निवडताना देखील विविध पर्याय उपलब्ध राहतील’.

कोण हे मानोलो मार्केझ?

  • 7 सप्टेंबर, 1968 रोजी जन्मलेल्या मानोलो यांच्या पदरी आहे तो स्पॅनिश फुटबॉलमधला व खास करून कॅटलोनिया व कॅनरी बेटांच्या प्रदेशातला मोठा अनुभव.
  • मार्केझ यांच्या व्यवस्थापक म्हणून कारकिर्दीची सुऊवात ‘पीबी अँग्वेरा’ या स्पॅनिश क्लबपासून झाली. त्यांनी आपला खेळाडू या नात्यानं डाव समाप्त केला तो याच क्लबमध्ये...2013 मध्ये त्यांच्याकडे ‘आरसीडी एस्पानियोल ब’ संघाची जबाबदारी दिली अन् त्यांनी एका हंगामात स्पेनच्या तृतीय लीगमध्ये संघाला मार्गदर्शन केलं...
  • मानोलो यांनी व्यवस्थापन सांभाळलेल्या काही लोकप्रिय क्लबांमध्ये ‘लास पाल्मास’ व इतरांचा समावेश होतो...त्यानंतर क्रोएशियाच्या दिशेनं गेल्यावर पुढं त्यांचा मोर्चा आशियाकडे वळला. त्यांनी थायलंडमध्ये देखील व्यवस्थापक म्हणून काही काळ सूत्रं सांभाळली.

‘आयएसएल’च्या यंदाच्या मोसमासंबंधी...

‘हा मोसम प्रत्येक संघासाठी कठीण जाणार’, असं भाकीत मानोलो मार्केझ यांनी व्यक्त केलं होतं अन् ते पहिल्या लढतीपासून खरं ठरताना दिसून येऊ लागलंय... ‘प्रत्येकानं गेल्या मोसमासंबंधी असंच म्हटलं होतं. पण मला ते मान्य झालं नाही. परंतु यंदा मात्र जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळेल. आम्हाला सुरुवात चांगल्या पद्धतीनं करावी लागेल. कारण फक्त 24 सामने खेळावे लागतील...‘बेंगळूर एफसी’, ‘मोहन बागान’, मुंबई सिटी यांनी काही बड्या खेळाडूंशी करार केलेत. चेन्नईचा संघ देखील अनुभवी प्रशिक्षक ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली वावरताना वेगळा वाटतोय...‘ड्युरँड करंडक’ जिंकणारा ‘नॉर्थ ईस्ट युनायटेड’ सुद्धा घातकच. खेरीज सर्जे लॉबेरा यांच्या ‘ओडिशा’कडे दुर्लक्ष करून कसं चालेल ?...‘एफसी गोवा’ला स्थिरतेसाठी सातत्याचं दर्शन घडवावंच लागेल. गेल्या मोसमात आम्ही पहिल्या टप्प्यात एकही हार स्वीकारली नव्हती, परंतु त्यानंतर ‘मोहन बागान’ व ‘नॉर्थ ईस्ट युनायटेड’नं आम्हाला एकूण तीन वेळा पराभूत केलं. शिवाय ‘मुंबई’विरुद्ध 2-0 अशी आघाडी मिळविलेली असताना इंज्युरी वेळेत आम्ही तब्बल तीन गोल खाल्ले’, मार्केझ म्हणतात...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.