राजकीय उत्तरायणला सुरूवात
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी घेतलेली भेट, शिवसेना नेत्यांकडून फडणवीस यांच्यावर केलेली स्तुतीसुमने, शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे केलेले कौतुक बघता राज्यातील राजकीय उत्तरायण सुरू झाले आहे. मुंबई आणि महामुंबईतील महापालिकांवर वर्चस्व ठेवण्यासाठी भाजप शिंदेंच्या मदतीने ठाकरे गटावर मात करणार? की शिवसेना स्वबळावर लढुन पुन्हा एकदा महापालिकेवर आपला भगवा फडकवणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या महाअधिवेशनात भाजपने पंचायत ते संसद भाजपच अशी घोषणा दिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका झाल्यानंतर आता राज्यातील 27 महापालिकांच्या निवडणूका केव्हाही होऊ शकतात. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, कुळगाव-बदलापुर, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार अशा महामुंबईतील सर्व महापालिका (भिवंडी आणि वसई-विरार वगळता) या नेहमीच शिवसेना आणि भाजपच्या ताब्यात राहिल्या आहेत. त्यातील मुंबई आणि ठाणे या महापालिका या उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. या महापालिकांवर भाजपने स्बवळावर कधीच वर्चस्व मिळवले नाही. 2017 ची शेवटची मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढली या निवडणुकीत शिवसेनेने 93 तर भाजपने 82 जागा जिंकल्या. भाजपने जर मनात आणले असते तर अखिल भारतीय सेना आणि अपक्षांच्या मदतीने मुंबई महापालिका भाजपने 2017 ला ताब्यात घेतली असती, मात्र 2017 ला भाजपची शिवसेनेसोबत युती कायम असल्याने भाजपने आगामी लोकसभा-विधानसभा आणि राष्ट्रपतीच्या निवडणुका बघता विरोधीपक्षात राहत चौकीदाराची भूमिका बजावली. आता मात्र सगळं चित्र बदलले आहे, भाजपशिवाय कोणत्याच पक्षाला महापालिका निवडणूक जिंकता येईल असे दिसत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत आपली ताकद दाखवली. विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेने मुंबईतील 36 जागांपैकी 10 जागा तर शिंदेंच्या शिवसेनेने 5 जागा जिंकल्या, भाजपने सर्वाधिक 15 जागा जिंकल्या असल्या तरी 2019 च्या तुलनेत भाजपच्या दोन जागा कमी झाल्या आहेत हे विसरता कामा नये. तर लोकसभेला शिवसेनेने 6 पैकी 3 जागा जिंकल्या तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या शिवसेनेच्या मदतीमुळे जिंकल्याचे बोलले जाते. शिंदे गटाची एक जागा आली ती रवींद्र वायकर यांची अवघ्या 48 मतांनी, भाजपला केवळ उत्तर मुंबई या एका जागेवर यश मिळवता आले. शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते आमदार, खासदार, नगरसेवक बाहेर पडले मात्र शिवसेनेची तळागाळातील कार्यकर्त्यांची फळी मात्र आजही ठाकरेंसोबत असल्याचा दावा ठाकरे करतात. त्यामुळेच शिवसेना पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या विधानपरिषद आणि मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांमध्ये जिंकली. आता मात्र शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. स्वबळावर निवडणूक लढविल्यास शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते. त्यातच भाजपसोबत महायुतीत राष्ट्रवादी (अजित पवार) असल्यास याचा काही अंशी फटका भाजपला बसू शकतो, तर शिवसेनेच्या स्वबळाच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांना बसण्याची शक्यता आहे. मुंबईत काँग्रेसचे फक्त तीन आमदार निवडून आले, काँग्रेसने त्यांच्याकडेच असलेल्या धारावी, मालाड (प.) आणि मुंबादेवी या जागा कायम ठेवल्या. ठाकरेंच्या शिवसेनेने हारून खान, वरूण सरदेसाई, मनोज जामसुतकर, महेश सावंत, अनंत नर अशा नवीन आमदारांना निवडून आणले. मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काही मतदार संघात ताकद आहे, त्या मतदार संघात काँग्रेसने निवडणूक लढवली. मात्र ठाकरे यांनी दहा आमदार निवडून आणणे म्हणजे शिवसेनेची मुंबईतील ताकद नाकारण्यासारखी नाही. आता शिवसेना स्वबळावर लढल्यास जास्तीत जास्त जागा लढवता येतील, आघाडीत राहुन काँग्रेस-राष्ट्रवादीला जागा सोडल्याने याचा शिवसेनेलाच मोठा फटका बसल्याने महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. दुसरीकडे महायुतीत भाजप स्वबळावर लढणार की महायुतीत हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजप स्वबळावर लढली तर शिंदेंच्या शिवसेनेला भाजपशिवाय स्वत:चे अस्तित्व दाखविण्याची ही पहिली संधी असणार आहे, जर महायुतीत लढली तर शिवसेनेला कमी जागा मिळणार त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेसमोर महापालिका निवडणुका लढणे हे मोठे प्रश्नचिन्ह असणार आहे. भाजपने सगळ्याच महापालिकांमधील विधानसभेत त्या भागातील नेत्यांना बळ दिले आहे. नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेसाठी गणेश नाईक यांना मंत्रीपद, कल्याण -डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण यांना तर भाजपने प्रदेश कार्याध्यक्ष केले आहे. पनवेलमध्ये प्रशांत ठाकुर, वसई-विरार महापालिकेतील सर्व विधानसभा भाजपने जिंकत ठाकुर शाही संपवली आहे तर दुसरीकडे उल्हासनगरमधील देखील पप्पु कलानी यांची राजवट संपवली आहे. मिरा-भाईंदरमधुन पुन्हा भाजपने नरेंद्र मेहता यांना बळ दिले आहे, भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी देखील मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भागातील सपाचे रईस शेख वगळता सगळे आमदार भाजपने निवडून आणले, त्यात महत्त्वाचे म्हणजे समाजवादीपक्ष देखील आघाडीतून बाहेर पडला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होत असल्याच्या राजकीय चर्चा असताना, तिकडे शिंदे गट आणि भाजपात मात्र अस्वस्थता दिसून येत आहे. राज्यातील आघाडी आणि युती दोन्ही पक्षांचे राजकारण आता भाजपभोवती फिरत आहे. शिंदे गटाचे नेते ठाकरे यांच्या भाजपबाबतच्या भूमिकेने अस्वस्थ आहे, त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात काहीही असंभव नसल्याचे विधान केल्याने ही अस्वस्थता अजून वाढली आहे. 2019 नंतर राज्याच्या राजकारणात काहीही अशक्य नसल्याचे दाखवून दिले आहे, 2019 पासूनचे राजकारण बघितले तर विरोधकांपेक्षा सत्ताधारीपक्षांमध्येच जास्त अस्वस्थता असल्याचे दिसत आहे.
मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होते, महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय उत्तरायणाला सुरूवात झाली असून, संक्रांतीच्या निमित्ताने विरोधकांकडून उध्दव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांच्याकडून भाजपबाबत गोड बोलण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणावर संक्रांत असणार हे काळच ठरवेल.