For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेजोमय मंगलपर्वाची सुरुवात

06:58 AM Nov 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
तेजोमय मंगलपर्वाची सुरुवात
Advertisement

घरोघरी उजळणार लक्ष लक्ष दीपज्योती : आज लक्ष्मीपूजन : बाजारपेठेत उत्साहाला उधाण 

Advertisement

पूजेचे साहित्य, रांगोळीची विक्री : झेंडुच्या फुलांना मोठी मागणी

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

ज्योतीने तेजाची आरती करण्याचा, तमातून तेजाकडे जाण्याचा, अविवेकाची  काजळी सारून विवेकाची कास धरण्याचा आणि मानवी समूहाने एकत्र येऊन साजरा करण्याचा प्रकाशोत्सव म्हणजे दिवाळी. गुरुवारी वसुबारस व शुक्रवारी धनतेरस पूजेने दिवाळी सणाला प्रारंभ झाला. रविवारी दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे अभ्यंगस्नानाचा दिवस. अर्थात नरकचतुर्दशी. याच दिवशी लक्ष्मीपूजनाचाही मुहूर्त आला आहे. हे दोन्ही दिवस उत्सवाच्या यादीतील अत्यंत महत्त्वाचे दिवस असल्याने संपूर्ण शहर दीपोत्सवाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

नरकासुराचा वध ही दंतकथा, आख्यायिका किंवा मिथक कथा असू शकते. परंतु, त्याचा गर्भितार्थ हाच, की जे जे हीन आहे, जे मानवी समूहासाठी कल्याणकारी नाही अशाला नाकारणे होय. याच हेतूने नरकचतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नानापूर्वी कारिट फोडले जाते. त्यातही नरकासुराचे वधाचे हे प्रतिक असले तरीसुद्धा कारिटाची अल्पशी का होईना, चव जिभेवर ठेवली जाते. कदाचित आयुष्यात सर्व काही गोड नाही तर कटु-गोड या दोघांनाही सामोरे जावे लागेल, हा संदेश त्यातून दिला गेला असावा.

दिवाळीचा फराळ हा सर्वांनी एकत्र येण्यासाठीचे एक निमित्त मात्र. आता वर्षभर फराळाचे पदार्थ मिळत असले तरी दिवाळी दिवशीच्या फराळाची लज्जत वेगळीच. सुदैवाने नोकरदार गृहिणींचा विचार करून बाजारपेठेमध्ये आता तयार फराळ उपलब्ध झाला आहे. अर्थात हौसेला मोल नसल्याने शहरात आजही घरोघरी महिलांनी स्वत: फराळ करण्याचा आनंद घेतलाच आहे. रविवारीच लक्ष्मीपूजन असल्याने उत्साहाला उधाण येणार असून गर्दीचाही विक्रम होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सणाच्या निमित्ताने शनिवारी आठवडी बाजारा दिवशी सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी झाली होती. रविवारी नरकचतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन असल्याने शनिवारीच खरेदीला वेग आला होता. विशेषत: फळे, फुले, हार, दिवे, पणती, आकाश कंदिल आणि साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात फळा-फुलांची आवक वाढली आहे. त्यामुळे बाजार फळा-फुलांनी बहरला आहे. सफरचंद, संत्री, मोसंबी, डाळींब, पेरु, केळी आदी फळांची विक्री वाढली आहे. याबरोबर पूजेसाठी पाच फळांची मागणीही देखील वाढली आहे. विशेषत: लक्ष्मी पूजनाच्या पूर्व संध्येला बाजारात झेंडुची फुले, ऊस, आंबोती, केळीची पाने, कापूर, धूप, अगरबत्ती, नाडापुडी, तोरण, बत्ताशा आदींची विक्री वाढली होती. विशेषत: पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, मेणसी गल्ली, नरगुंदकर भावे चौक, रामलिंगखिंड गल्ली आदी परिसरत गजबजून गेलाहोता.

सुक्या मेव्याला पसंती

दिवाळीनिमित्त सुक्या मेव्याची मागणी वाढली होती. बदाम, पिस्ता, काजू, मणूका, खजूर, खारीक, आदी पदार्थांना पसंती मिळाली. दिवाळीत भेटवस्तुंची देवाण-घेवाण होते. यापार्श्वभ्घ्tमीवर सुक्या मेळाव्याची खरेदी-विक्री वाढली होती.

पूजेचे साहित्य, रांगोळीची विक्री

बाजारात कापूस, अगरबत्ती, दुर्वा, फुलांच्या विक्री बरोबर रांगोळीची विक्रीही वाढली होती. रंगीबेरंगी रांगोळी बाजारात आकर्षक ठरत होती. 10 रुपये पाकिट या प्रमाणे विक्री सुरु होती.

लक्ष्मी ही केवळ पैशाच्या किंवा सुवर्णाच्या स्वरुपातच नाही तर ती मनाच्या श्रीमंतीमध्ये, ज्ञानाच्या, गुणवत्तेच्या उंचीमध्येसुद्धा आहे. तिची पूजा करणे हाच तर या पूजनाचा अर्थ. व्यापारीवर्ग लक्ष्मीपूजनापासून नवीन खातेकिर्द वह्यांमध्ये नोंदी करतो. त्यामुळे बाजारपेठेत खातेकिर्द वह्यांची खरेदी दरवर्षीप्रमाणे तेजीत झाली. कोहळ्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता आहे असे मानले जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनादिवशी घरोघरी किंवा आपल्या दुकानांमध्ये, पेढीवर कोहळा बांधला जातो. अर्थातच बाजारात कोहळ्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे.

झेंडुच्या फुलांची आवक

बाजारात लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर झेंडुंच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. 30 रुपये किलो प्रमाणे झेंडुंची फुले विक्री होवू लागली आहेत. तर झेंडुंच्या फुलांचा हार 50 रुपये प्रमाणे विक्री होत आहे. रविवारी झेंडुंच्या फुलांची विक्री आणि आवक देखील वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कपडे, इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या शोरुममध्ये गर्दी

साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन वस्तु खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तु आणि वाहनांच्या शोरुममध्ये बुकींगसाठी गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे उलाढालही वाढली आहे. याबरोबर शुभमुहूर्तावर सोने, चांदी खरेदीला देखील वेग आला आहे. त्यामुळे सराफी दुकानांमध्ये गर्दी होत आहे.

वाहतूक कोंडी

शनिवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. गर्दी अधिक झाल्याने नागरिकांना कसरत करतच खरेदी करावी लागली. गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदी ठिकाणी कोंडी निर्माण झाली होती.

खरेदी करा आनंदाने!

आज नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन या दोन्हींचे मुहूर्त आहेत. परंतु, अमावस्या असल्याने खरेदी करायची की नाही? असा एक प्रश्न लोकांना पडला आहे. मात्र, दिवाळीचे पर्व हे आनंदी दिवसाचे पर्व असते. त्यामुळे दुपारी 3.15 ला अमावस्या सुरू झाल्यानंतरसुद्धा सोन्या-चांदीची, दागिन्यांची किंवा आपल्याला हव्या त्या वस्तूंची खरेदी करण्यास काहीही हरकत नाही, अशी माहिती संजीवाचार्य वाळवेकर यांनी दिली. याशिवाय ते म्हणाले, लक्ष्मीला अलक्ष्मी नावाची बहीण आहे. रविवारी रात्री तिचेही पूजन करायला हवे. हे पूजन म्हणजे इतर पूजनासारखे नव्हे तर या अलक्ष्मीचे नि:सारण करायला हवे. म्हणजेच तिला आपल्या घरातून परिसरातून बाहेर पाठवायला हवे. म्हणून रविवारी रात्री 10 नंतर घरासमोर पाणी घालून अलक्ष्मीची पाठवणी करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त रविवारी 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:31 मिनिटांनी ते रात्री 8:36 मिनिटांपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये  माता लक्ष्मीची विधीवत पूजा करू शकता.भारतीय पंचागात शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. कोणतेही शुभ कार्य शुभ मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे.

मात्र यावर्षी पंचांगकर्त्यांच्या म्हणण्यानुसार लक्ष्मीपूजनाचे दोन शुभ मुहूर्त आहेत.

  1. दुपारी 1:42 ते 2:48 पर्यंत
  2. संध्याकाळी 5.31 ते 8:36 पर्यंत
Advertisement
Tags :

.