सूर्या-गंभीर पर्वाचा विजयारंभ
पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा लंकेवर 43 धावांनी विजय : मालिकेत 1-0 ने आघाडी : सूर्यकुमार यादव सामनावीर
वृत्तसंस्था/ डाम्बुला
सामनावीर सुर्यकुमार यादव (58), ऋषभ पंत (49) यांची दमदार खेळी व रियान पराग, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या टी 20 सामन्यात श्रीलंकेवर 43 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 214 धावांचे आव्हान ठेवले होते. श्रीलंकेच्या पथुम निसांका 79 धावा आणि कुसल मेंडिसने 45 धावा करत टेन्शन वाढवले होते पण अक्षर पटेलने निसांका आणि परेराला बाद करुन मॅच भारताच्या बाजूने फिरवली. श्रीलंकेचा संघ 1 बाद 140 वर असताना पुढील 30 धावात सर्वबाद झाला. श्रीलंकेचा डाव 170 धावांवर आटोपला. उभय संघातील दुसरा सामना दि. 28 रोजी खेळवण्यात येईल.
प्रारंभी, टीम इंडियाचा कर्णधार सुर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल या दोघांनी केली. जैस्वालने 40 आणि शुभमन गिलने 34 धावा केल्या. या जोडीने 74 धावांची सलामीची भागिदारी केली. यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने लंकन गोलंदाजांची धुलाई करताना 26 बॉलमध्ये 58 धावांची वादळी खेळी केली. तर, रिषभ पंतने देखील 49 धावांचे योगदान दिले. यानंतर हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. अक्षर पटेल 10 धावांवर नाबाद राहिला. भारताने अखेर 20 ओव्हरमध्ये 7 बाद 213 धावा केल्या. श्रीलंकेकडून मथिशा पथिरानाने 40 धावा देत 4 विकेट घेतल्या.
भारताने विजयासाठी श्रीलंकेपुढे विजयासाठी 214 धावांचे आव्हान ठेवले हेते. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेने आक्रमक सुरुवात केली होती. पथुम निसांका आणि कुसल मेंडिसने 84 धावांची भागिदारी करत सूर्यकुमार यादवचे टेन्शन वाढवलं होते. पण, अर्शदीप सिंगने कुसल मेंडिसला 45 धावांवर बाद केले. यानंतर श्रीलंकेला निसांकाच्या रुपात 140 धावांवर असताना दुसरा धक्का बसला. निसांकानं 48 चेंडूत 79 धावा केल्या. निसांकाला अक्षर पटेलने बाद केलं आणि येथेच मॅच भारताच्या बाजूने फिरली. पुढील 30 धावांमध्ये श्रीलंकेने नऊ विकेट गमावल्या. त्यांचा डाव 19.2 षटकांत 170 धावांवर आटोपला. भारताकडून रियान परागने सर्वाधिक 3 तर अर्शदीप सिंग व अक्षर पटेलने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 7 बाद 213 (जैस्वाल 40, शुभमन 34, सुर्या 58, पंत 49, पथिरान सर्वाधिक 4 बळी)
श्रीलंका 19.2 षटकांत सर्वबाद 170 (निसंका 79, कुसल मेंडिस 45, कुसल परेरा 20, रियान पराग 3 बळी, अर्शदीप व अक्षर पटेल प्रत्येकी दोन बळी).