मधमाशा करणार आता सीमेचे रक्षण
गुन्हे रोखण्यासाठी बीएसएफची अनोखी योजना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) भारत-बांगलादेश सेमेवर गुरांच्या तस्करीसमवेत अन्य गुन्हे रोखण्यासाठी एक अनोखा प्रयोग करत आहे. याच्या अंतर्गत तेथे मधमाशांचे पोळे तयार केले जाणार आहे. या पुढाकाराला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने निमलष्करी दल आणि संबंधित दलांना सीमेवर मधमाशांचे पोळे लावण्याचा निर्देश दिला आहे. यातून स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील तसेच सुरक्षा मजबूत होणार आहे.
हा निर्णय केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखालील ‘मधमाशी पालन आणि मध मिशन’वर झालेल्या बैठकीदरम्यान घेण्यात आला. यादरम्यान पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात बांगलादेश सीमेवर रक्षणासाठी तैनात बीएसएफच्या 32 व्या बटालियनकडून सुरु करण्यात आलेल्या पुढाकाराची प्रशंसा करण्यात आली आहे.
सुरक्षा मजबूत करणे उद्देश
बैठकीत सर्व निमलष्करी दलांना हा पुढाकार स्वत:च्या संबंधित क्षेत्रांमध्ये अवलंबिण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सशस्त्र सीमा दल (नेपाळ आणि भूतान सीमा) आणि आयटीबीपी (चीन सीमा), सीआरपीएफ आणि सीआयएसएफ, सीएपीएफ, आसाम रायफल्स, एनएसजी आणि एनडीआरएफ यासारख्या अन्य दलांकडे सुरक्षेसाठी कुंपण नाही, याचमुळे मधमाशांचे पोळे तेथे निर्माण करत सुरक्षा मजबूत केली जाऊ शकते. मधमाशी पालनाचा पुढाकार अवलंबिण्याचा उद्देश दुर्गम ठिकाणी रोजगार निर्माण करणे आणि स्थानिक लोकांचे समर्थन मिळविणे आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे लोकच या क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे ठरत असतात, असे बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
तस्करी रोखण्याचा उद्देश
भारत-बांगलादेश सीमेवर मधमाशांचे पोळे तयार करण्याची कल्पना मागील वर्षी 2 नोव्हेंबरपासून साकार होऊ लागली आहे. आतापर्यंत सुमारे मधमाशांच्या 200 पोळ्यांना सीमेवर लावण्यात आले आहे. या पुढाकाराचा उद्देश गुरे, सोने आणि अमली पदार्थांची तस्करी रोखणे आहे. बीएसएफच्या दक्षिण बंगाल सीमेच्या अंतर्गत येणाऱ्या सीमावर्ती भागांमध्ये गुरे, सोने, चांदी आणि अमली पदार्थांची तस्करी यासारखे सीमापार गुन्हे होण्याचा धोका आहे. गुंडांनी आणि तस्करांनी अवैध कारवायांसाठी तारांचे कुंपण नष्ट करण्याचे प्रयत्न केले आहेत. याचमुळे हा पुढाकार हाती घेण्यात आल्याची माहिती बीएसएफ बटालियनचे कमांडिंग ऑफिसर सुजीत कुमार यांनी दिली.
आयुष मंत्रालयाचाही सहभाग
या प्रकल्पासाठी बीएसएफने आयुष मंत्रालयालाही सामील केले आहे. मंत्रालयाने बीएसएफला मिश्र धातूने निर्माण ‘स्मार्ट कुंपणा’वर मधमाशांचे पोळे योग्यप्रकारे लावण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान प्रदान केले आहे. सीमेच्या कुंपणावर मधमाशांचे पोळे तयार करण्याच्या मॉडेलची सुरुवात झाल्यापासून नादियाच्या सीमावर्ती क्षेत्रात बीएसएफ कर्मचारी, आयुष मंत्रालय आणि शेकडो स्थानिक लोकांच्या भागिदारीतून एक लाखाहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली आहे. आयुष मंत्रालयाला फुलझाडांची रोपे उपलब्ध करण्याची विनंती करण्यात आली होती.