महायुतीतील खेचाखेच, ठाकरे सेनेच्या हालचालीचे रणांगण
महाराष्ट्राच्या राजकीय पटावर विधानपरिषद निवडणुकीचे ढग दाटले आहेत. 17 जागांसाठी 18 जून 2026 रोजी मतदान आणि 22 जूनला निकाल अपेक्षित असताना महायुतीत जागावाटपाचा तिढा, शिंदे-फडणवीस यांच्यातील सूत्रीय तणाव आणि महाविकास आघाडीची रणनीती यामुळे वातावरण तापले आहे. ही निवडणूक केवळ 17 जागांची नाही तर महायुतीतील संतुलन आणि विरोधकांच्या पुनरुत्थानाची कसोटी ठरेल.
सूत्रांच्या माहितीनुसार महायुती एकत्र लढणार असून, प्राथमिक फॉर्म्युला भाजप 11-12 जागा, शिंदे शिवसेना 3-4 जागा, अजित पवार राष्ट्रवादी 2 जागा असा आहे. भाजपकडे नागपूर, पुणे, अमरावती, सोलापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर-जालना, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आदी मजबूत मतदारसंघ आहेत. संभाजीनगर, नाशिकवरून त्यांचा शिंदेंशी वाद आहे. शिवसेनेला ठाणे, नाशिक, यवतमाळसारखे भाग मिळण्याची शक्यता, तर राष्ट्रवादीला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हिंगोली-परभणी सारखे मतदार संघ भाजप सोडू शकते. त्यांचा पुण्यावर दावा आहे. पण तो टिकेल असे वाटत नाही.
भाजप तडजोडी आता आपल्या अटींवर करण्याइतका सक्षम आहे. मित्र पक्षांना काही बाबतीत मोकळीक दिली जात असली तरी याबाबतीत तडजोड होईल असे दिसत नाही. हा फॉर्म्युला अद्याप अंतिम नाही. शिंदे गट 5-6 जागांवर दावा ठेवून आहे, तर भाजपकडून 4 च्या आसपास देण्याची तयारी दाखवली जात आहे. यामुळे तिढा कायम आहे. यात कधीकाळी ठाकरे शिवसेनेने पाच जागा लढवलेल्या असल्याने भाजपकडून त्याहून कमी मिळवले तर शिंदे यांच्यासाठी ते नामुष्कीचे ठरणार आहे. त्यामुळेच प्रकरण दिल्लीपर्यंत जाऊन परत आले आहे आणि राज्यातच सोडवले जाईल असे सांगितले जात आहे.
शिंदे-फडणवीस तणाव व खेचाखेच
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांवर अलीकडे अनेक चर्चा रंगल्या आहेत. वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटीतही पूर्ण तोडगा निघाला नाही. शिंदे गटातील आमदार-मंत्र्यांमध्ये नाराजी आहे; सातारा जिल्हा परिषद, रायगडसह विविध ठिकाणी ‘दुय्यम वागणूक’ ची भावना व्यक्त होत आहे. काहींनी राजीनाम्याची धमकीही दिली. फडणवीस यांनी ‘कोणताही दुरावा नाही’ असे स्पष्ट केले असले तरी, जागावाटपावरून दिल्ली दौऱ्यांसह बैठका सुरू आहेत.
भाजपची ‘मोठा भाई’ भूमिका आणि शिंदे गटाची ‘समान भागीदारी’ची मागणी यात मुख्य खेचाखेच आहे. अजित पवार गट सध्या शांत असला तरी त्यांचाही वाटा सुरक्षित ठेवण्याची धडपड चालू आहे.
ठाकरे सेनेच्या हालचाली
ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीत सक्रिय आहे. अलीकडे पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत अंबादास दानवे यांना उमेदवारी देऊन ठाकरे गटाने आपली इच्छा स्पष्ट केली. उद्धव ठाकरे स्वत: उमेदवार होणार नाही हे स्पष्ट करून विधीमंडळाच्या राजकारणातून आपली सुटका करून घेतली. ठाकरे सेना महाआघाडीमध्ये 6-7 जागांवर दावा करत असल्याचे सूत्र सांगतात.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 235 जागा जिंकून भारी बहुमत मिळवले, मविआची अवस्था कमकुवत झाली. आता विधानपरिषदेत मविआने काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्षनेतेपदावरूनही आघाडीत मतभेद दिसले. तरीही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघात मविआ काही जागांवर चांगली लढत देऊ शकते, विशेषत: पुणे, ठाणे, नाशिकसारख्या भागांत.
कोठे कोणाला यश मिळू शकेल?
महायुतीला बहुसंख्य जागा (14 प्लस) मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपची मजबूत संघटनात्मक ताकद आणि सत्तेचा फायदा निर्णायक ठरेल. अमरावती, सोलापूर, नागपूरसारख्या ठिकाणी प्रलोभनाच्या बातम्या येत असल्या तरी महायुतीचे पारडे जड आहे. त्यांना आव्हान देणारे टिकाव धरणे मुश्किल.
मविआ 2-4 जागांवर यश मिळवू शकते. ठाणे-पालघर, रायगड, पुणे विभागात चांगली लढत अपेक्षित. मात्र, आघाडीतील समन्वयाचा अभाव अडथळा ठरू शकतो.
छोटे पक्ष/अपक्ष काही मतदारसंघात प्रभाव टाकू शकतात. विधानपरिषद निवडणूक महायुतीसाठी ‘सत्ता कायम ठेवण्याची’ आणि मविआसाठी ‘पुनरुत्थानाची’ संधी आहे. महायुतीत जागावाटपाचा तणाव लवकर सोडवला नाही तर काही जागांवर अंतर्गत उमेदवारी किंवा मतविभाजन होऊ शकते, ज्याचा फायदा मविआला मिळेल.
शिंदे-फडणवीस यांच्यातील समन्वय हा महायुतीच्या यशाचा कळीचा मुद्दा राहील. ठाकरे सेनेने मविआला एकत्र ठेवले तर विरोधक काही जागा वाचवू शकतील. एकूणच, ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘सत्ताधारी एकता वि. विरोधकांच्या एकजूटी’ ची परीक्षा आहे. निकालानंतर पुढची समीकरणे स्पष्ट होतील. महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यात हे निकाल महत्त्वाचे ठरतील.
शिवराज काटकर