गोलंदाजांच्या तालावर नाचले फलंदाज
दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडिज दुसरी कसोटी : गयानाच्या खेळपट्टीवर पहिल्याच दिवशी 17 बळी
वृत्तसंस्था/ गयाना, वेस्ट इंडिज
गयाना येथे सुरु असलेल्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी गोलंदाजांचा कहर पहायला मिळाला. पहिल्या डावातच यजमान संघाचा वेगवान गोलंदाज शमार जोसेफने पाच बळी घेण्याची किमया केली. यानंतर द. आफ्रिकेच्या विआन मुल्डरने अवघ्या 18 धावांत 4 बळी घेतले. विशेष म्हणजे, एकाच दिवसात एकूण 17 विकेट पडल्या, जो गयानामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात सर्वाधिक बळी पडण्याचा विक्रम आहे. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकन संघ 160 धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या 97 धावांत 7 विकेट्स अशी आहे. आता, दुसऱ्या दिवशी गोलंदाज काय कमाल दाखवतात, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.
उभय संघातील पहिल्या कसोटीमधील त्रिनिदादच्या संथ खेळपट्टीच्या विरुद्ध, गयानामध्ये सामना खूप वेगवान झाला. दोन्ही कर्णधारांना प्रथम फलंदाजी करण्याची इच्छा होती. गयानाची खेळट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक होती, याच खेळपट्टीवर दोन्ही संघाचे वेगवान गोलंदाजांनी कहर केला. वेगवान गोलंदाजांनी एकूण 82.2 षटके टाकली आणि 68 धावांत 15 बळी घेतले.
शमार जोसेफचा कहर, 33 धावांत 5 बळी
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावातील चौथ्या षटकातच आफ्रिकेने आपली पहिली विकेट गमावली. टोनी झोर्जीला जेडेन सील्सने बाद करत पहिला धक्का दिला. यानंतर शामर जोसेफने धोकादायक गोलंदाजी करत आफ्रिकेच्या फलंदाजांना क्रीजवर टिकू दिले नाही. जोसेफने अनुभवी एडन मार्करामला इनस्विंगने पायचीत केले आणि त्यानंतर अवघ्या दोन चेंडूंत त्याने टेंबा बावुमाला तंबूचा रस्ता दाखवला. ट्रिस्टन स्टब्जने 26 तर नवोदित डेव्हिड बेडिंगहॅमने 28 धावा केल्या. काईल वेरेनने 21 धावांचे योगदान दिले. यानंतर एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण खेळ करता आला नाही. एकवेळ आफ्रिकेची 9 बाद 97 अशी बिकट स्थिती होती, यावेळी डेन पीट आणि नांद्रे बर्गर यांनी दहाव्या विकेटसाठी 63 धावांची विक्रमी भागीदारी केली व संघाला 160 धावापर्यंत मजल मारुन दिली.
डेन पीटने सर्वाधिक नाबाद 38 धावा फटकावल्या तर बर्गरने 2 चौकारासह 26 धावांचे योगदान दिले. बर्गर बाद झाल्यानंतर आफ्रिकेचा पहिला डाव 54 षटकांत 160 धावांवर आटोपला. वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चेंडूने आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या शमार जोसेफने 5 फलंदाजांना बाद केले. सील्सलाही 3 विकेट मिळाल्या. गुडाकेश मोटी व जेसन होल्डरने प्रत्येकी एक बळी घेतला.
आफ्रिकेचेही जोरदार कमबॅक
फलंदाजीसाठी अवघड असलेल्या खेळपट्टीवर पलटवार करण्यात आफ्रिकेला वेळ लागला नाही. वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विंडीजने पहिली विकेट गमावली. मायकेल लुईस खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. व्रेग ब्रेथवेटला केवळ 3 धावा करता आल्या. अॅथनेज व केविन हॉज हे दोघेही स्वस्तात तंबूत परतले. नवख्या केसी कार्टीने 26 धावांचे योगदान दिले. जोशुआ डी सिल्वाही फार काळ मैदानावर टिकला नाही. 4 धावा काढून तो बाद झाला. डी सिल्वा बाद झाल्यानंतर विंडीजची 6 बाद 56 अशी स्थिती होती. या बिकट स्थितीत जेसॉन होल्डरने आफ्रिकन गोलंदाजांचा प्रतिकार केला. त्याने सातव्या विकेटसाठी गुडाकेश मोतीसोबत 41 धावांची भागीदारी केली. ही जोडी जमलेली असताना मोतीला केशव महाराजने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर जेसॉन होल्डर 33 धावा करुन नाबाद परतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान विंडीजने 28.2 षटकांत 97 धावा केल्या होत्या. अद्याप ते 63 धावांनी पिछाडीवर आहेत.
आफ्रिकेच्या विआन मुल्डरने शानदार गोलंदाजी करताना 4 तर नांद्रे बगर्रने 2 गडी बाद केले. याशिवाय, केशव महाराजने एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव 54 षटकांत सर्वबाद 160 (मार्करम 14, ट्रिस्टन स्टब्ज 26, डेन पीट नाबाद 38, नांद्रे बर्गर 23, शमार जोसेफ 33 धावांत 5 बळी, जेडेन सील्स 45 धावांत 3 बळी)
वेस्ट इंडिज पहिला डाव 28.2 षटकांत 7 बाद 97 (केसी कार्टी 26, जेसॉन होल्डर खेळत आहे 33, गुडाकेश मोती 11, विआन मुल्डर 18 धावांत 4 बळी, बर्गर 32 धावांत 2 बळी, केशव महाराज 1 बळी).