For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्ञानाचा वटवृक्ष

06:05 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्ञानाचा वटवृक्ष
Advertisement

कोल्हापूरच्या मातीत जन्मलेले डॉ. डी. वाय. पाटील हे केवळ नाव नव्हते, तर ते एका विचाराचे प्रतीक होते. राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला ‘शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे’ हा मंत्र त्यांनी आयुष्यभर जपला. शिक्षण हे काही मोजक्या लोकांचे विशेषाधिकार नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका होती. याच ध्येयाने त्यांनी आयुष्यभर शिक्षणसंस्था उभारल्या, विद्यार्थ्यांना संधी दिली आणि समाजाला सक्षम करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधीजींच्या विचारातून समाजातील सर्व दुर्बल घटकांना सबल करण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. जुने काँग्रेसी नेते म्हणून त्यांचा लौकिक त्यांनी कायम जपला. त्यांच्या कार्याची व्याप्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती. कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई यांसह देशभर त्यांनी उभारलेल्या डी. वाय. पाटील समूहाच्या शैक्षणिक संस्था आज गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे जागतिक केंद्र म्हणून ओळखल्या जातात. वैद्यकीय, दंतवैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी, जैवतंत्रज्ञान, नर्सिंग, फार्मसी, क्रीडा आणि संशोधन अशा विविध क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली शैक्षणिक विश्वे आज लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहेत. त्यांच्या संस्थांमधून घडलेले डॉक्टर, अभियंते, संशोधक आणि उद्योजक जगभरात भारताचे नाव उज्ज्वल करत आहेत. हेच त्यांच्या कार्याचे खरे स्मारक आहे. डॉ. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व अनेक पैलूंनी समृद्ध होते. ते यशस्वी उद्योजक होते, प्रभावी लोकप्रतिनिधी होते, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या; मात्र कोणतेही पद त्यांच्या मनातील शिक्षक आणि समाजसेवकाला कधीच झाकोळू शकले नाही. त्यांच्या प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी विद्यार्थी, शिक्षण आणि समाजहित हीच मूल्ये होती. कोल्हापूरच्या विकासात त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय राहिले. शिक्षणसंस्था उभ्या राहिल्या, आधुनिक रुग्णालये निर्माण झाली, हजारो युवकांना रोजगार मिळाला आणि कोल्हापूरला राष्ट्रीय शैक्षणिक नकाशावर नवे स्थान मिळाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही महानगरांतील दर्जेदार शिक्षण मिळू शकते, हा विश्वास त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवला. शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांत त्यांनी केलेली गुंतवणूक म्हणजे समाजाच्या भविष्यावर केलेली गुंतवणूक होती. त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता सामान्य माणूस. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी, ग्रामीण कुटुंबातील मुलगा-मुली आणि शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या युवकांना संधी मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांना शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे, तर चारित्र्य, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी घडविण्याचे माध्यम वाटत होते. त्यामुळेच त्यांच्या संस्थांमध्ये गुणवत्ता, शिस्त आणि सामाजिक उत्तरदायित्व यांना विशेष महत्त्व दिले गेले. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या विचारांत शाहू-फुले-आंबेडकरांच्या आणि गांधीजींच्या  समतावादी परंपरेचा ठसा स्पष्ट दिसून येत होता. जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक परिस्थिती यापलीकडे जाऊन प्रत्येकाला शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे, हा त्यांचा विश्वास होता. शिक्षणातूनच समाजातील विषमता कमी होईल आणि राष्ट्र अधिक सक्षम बनेल, या विचारासाठी त्यांनी आयुष्यभर अविरत परिश्रम घेतले. त्यांनी घडवलेले विद्यार्थी, उभारलेल्या संस्था, दिलेली मूल्ये आणि पेटवलेला ज्ञानाचा दीप त्यांच्या अस्तित्वाची कायम साक्ष देत राहतील. डॉ. डी. वाय. पाटील यांचे जीवन हे संपत्तीच्या प्रदर्शनाचे नव्हे, तर समाजासाठी उभारलेल्या संस्थांचे, शिक्षणासाठी वाहिलेल्या आयुष्याचे आणि माणूस घडविण्याच्या अखंड ध्यासाचे प्रतीक होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. पण त्यांनी दिलेला विचार, त्यांनी निर्माण केलेल्या संस्था आणि त्यांनी रुजवलेली शिक्षणसेवेची परंपरा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ज्ञानाचा हा वटवृक्ष आज काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्यांनी दिलेली सावली, त्यांनी पेरलेली स्वप्ने आणि त्यांनी पेटवलेला ज्ञानाचा दीप महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक वाटचालीला चिरंतन प्रकाश देत राहील. तरुण भारत परिवाराची त्यांना श्रद्धांजली.

Advertisement

Advertisement
Tags :

.