इतिहासातील काळ्या दिवसाचे बॅनर चर्चेत
कणकवली /प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जोरादार राजकीय उलथापलथ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यात काही ठिकाणी 'श्रीधर नाईक अमर रहे', 'सत्यविजय भिसे अमर रहे' 'आजचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस' असा उल्लेख असलेले बॅनर काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. कणकवलीत मंगळवारी माजी आमदार परशुराम उपरकर व राजन तेली यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्काराच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंगळवारी रात्री तालुक्यात नांदगाव, तळेरे, कासार्डे याठिकाणी लावलेले सदरचे बॅनर चर्चेत आले आहेत. या बॅनरवर करण्यात आलेल्या काळा दिवसाचा उल्लेख हा कालच्या सत्काराच्या अनुषंगाने असल्याचे दिसून येते. 'सत्यविजय भिसे आम्हाला माफ करा' असा उल्लेखही काही बॅनरवर आहे.
कै. श्रीधर नाईक हत्येच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या परशुराम उपरकर यांची निर्दोष सुटका झाली होती. तर सत्यविजय भिसे खून प्रकरणीही संशयित आरोपी असलेल्या राजन तेली यांचीही निर्दोष मुक्तता झाली होती. मात्र, या दोन्ही माजी आमदारांचा उबाठा शिवसेनेत प्रवेश व त्यानंतर आयोजित सत्कार समारंभ तसेच या सत्कार समारंभानंतर लावण्यात आलेले बॅनर हे सध्या चर्चेत आले आहेत. मात्र, हे बॅनर नेमके कोणी लावले हे जरी सध्या गुलदस्त्यात असले तरीही बॅनरची चर्चा मात्र सुरु होती. मात्र, प्रशासनाने हे बॅनर बुधवारी सकाळी हटविले.