For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेश मंडळाने फोडले सरकारवर खापर

03:27 AM Jan 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेश मंडळाने फोडले सरकारवर खापर
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) रविवारी सांगितले की, ते भारतात होणाऱ्या आयसीसी पुऊष टी-20 विश्वचषक स्पर्धा 2026 मध्ये खेळण्यास इच्छुक होते, परंतु बांगलादेश सरकारच्या निर्णयाशी त्यांना बाधील राहावे लागले आणि सरकारने या दौऱ्यासाठी परवानगी दिली नाही. बीसीबीचे संचालक अब्दुर रझाक म्हणाले की, सर्व परदेश दौऱ्यांसाठी सरकारी मंजुरी अनिवार्य आहे आणि ती केवळ विश्वचषकापुरती मर्यादित नाही.

आरटीव्हीशी बोलताना रझाक म्हणाले की, मंडळाने सातत्याने सहभागासाठी आपली तयारी दर्शवली होती, परंतु अधिकृत सूचनांचे पालन करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ‘आम्ही नेहमीच म्हटलेले आहे की, आम्हाला खेळायचे आहे, पण हा सरकारचा निर्णय आहे. सरकार जे काही सांगेल, ते आम्हाला पाळावे लागेल आणि सरकारने दिलेला हा निर्णय केवळ याच वेळेसाठी नाही, जेव्हा जेव्हा आमचा कोणताही दौरा असतो, तेव्हा आम्हाला आधीच सरकारकडून परवानगी घ्यावी लागते’, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

बीसीबी मीडिया समितीचे अध्यक्ष अमजद हुसेन यांनी नंतर पुष्टी केली की, बांगलादेशला स्पर्धेतून वगळण्यात आले आहे आणि मंडळाने हा विषय पुढे न नेता आयसीसीचा निर्णय स्वीकारला आहे. ते म्हणाले की, आयसीसी मंडळाच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. तिथे एक निर्णय घेण्यात आला. त्यात स्पष्टपणे म्हटले होते की, जर वेळापत्रकात कोणताही बदल झाला नाही, तर आमचा संघ भारतातील स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. हा निर्णय सरकारने कळवला होता, असे ते म्हणाले. आयसीसी पुऊष टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये स्कॉटलंडने बांगलादेशची जागा अधिकृतपणे घेतली आहे.

पाकबाबत शंका, मात्र संघ जाहीर

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी हे आयसीसी पुऊष टी-20 विश्वचषक स्पर्धेतील संघाच्या सहभागाबद्दलच्या चिंता दूर करण्यासाठी पाकिस्तानच्या टी-20 विश्वचषक संघातील सदस्यांना भेटतील, असे वृत्त पाकिस्तानच्या जिओ न्यूजने रविवारी दिले आहे. रविवारी संघ जाहीर करण्यासाठीच्या पत्रकार परिषदेत पाकच्या सहभागाबद्दल शंका उपस्थित झाल्या.

विश्वचषकात पाकिस्तानच्या खेळण्याच्या शक्यतांबद्दल विचारले असता निवड समितीचे प्रमुख आकिब जावेद म्हणाले की, खेळाडू आणि व्यवस्थापन म्हणून, आम्ही विश्वचषकाची तयारी करत आहोत आणि अंतिम निर्णय पीसीबी आणि सरकारवर अवलंबून आहे. पीसीबीचे हाय परफॉर्मन्स संचालकही असलेले अकिब जावेद, पाकिस्तानचे मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठीचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन आणि टी-20 कर्णधार सलमान अली आगा नक्वी यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत संघाची घोषणा करण्यात आली. पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकची टी-20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी निवडलेला संघच विश्वचषकासाठी कायम ठेवण्यात आला आहे. 29 जानेवारीपासून ही मालिका सुरू होत आहे.

नक्वी खेळाडूंना विश्वचषकासंदर्भातील परिस्थितीबद्दल माहिती देतील आणि मंडळाचा दृष्टिकोन स्पष्ट करतील अशी अपेक्षा आहे, असे ए स्पोर्ट्सने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. पाकिस्तानच्या सहभागाबाबतचा अंतिम निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर घेतला जाईल. शनिवारी बोलताना नक्वी म्हणाले होते की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सुरक्षेच्या कारणास्तव सामने भारताबाहेर हलवण्याची बांगलादेशची विनंती फेटाळल्यानंतर त्यांना स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा सहभाग सरकारच्या मंजुरीवर अवलंबून आहे.

टी-20 विश्वचषकासाठी जाहीर झालेला पाक संघ : सलमान अली आगा (कर्णधार), अब्रार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर झमान, ख्वाजा मोहम्मद नफय, मोहम्मद नवाझ, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शहा, साहिबजादा फरहान, सईम आयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शदाब खान, उस्मान खान, उस्मान तारिक.

Advertisement

.