हाऊझीवर बंदी राहणारच!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कडक भूमिका
मडगाव : हाऊझीच्या खेळात मोठ्या प्रमाणात बक्षिसांची रक्कम असल्याने कायदा सर्वोच्च ठरतो आहे, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हाऊझीवर कडक कारवाई करण्याचा विचार केला आहे. दक्षिण गोव्यात खास करून सासष्टीत ‘पूर्वी कार्यक्रम आणि समारंभांमध्ये हाऊझीचे आयोजन केले जात होते हे खरे आहे, परंतु ते लहान पद्धतीने केले जात होते. जोपर्यंत ते लहान पद्धतीने आयोजित केले जात होते तोपर्यंत ते ठीक होते. परंतु, बक्षिसाची रक्कम ज्या पद्धतीने वाढली आहे ती चिंतेची बाब आहे. कायदा कठोर कारवाई करेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी श्रीमती एग्ना क्लीटस यांनी हाऊझी खेळावर बंदी घातली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कायदा सर्वोच्च आहे आणि कायद्याने त्यावर बंदी लागू केलेली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कायतान फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन हाऊझीवर बंदी घातल्यास गावातील फुटबॉल स्पर्धांवर परिणाम होणार असल्याचे निवेदन सादर केले होते. या बंदीचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केली होती, तरीही बंदी कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांना जुगार कायद्यांतर्गत हाऊझीवरील बंदीची अंमलबजावणी करुन साप्ताहिक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हाऊझीवर बंदी घातली तरी संगीत कार्यक्रम, फुटबॉल स्पर्धांच्या ठिकाणी हाऊझीचे आयोजन होत असल्याचे आढळून येत आहे. गेल्या दोन दिवसांमागे केपे येथे हाऊसीचे आयोजन करण्यात आले होते. सासष्टी बऱ्याच ठिकाणी हाऊसीचे फलक दिसून येतात.