For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज

01:15 PM Sep 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज
Advertisement

सकल मराठा समाजाची मागणी : सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते एकवटले : सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाजाची स्थिती अत्यंत बिकट

Advertisement

बेळगाव : मराठा समाज एकत्रित कुटुंबामध्ये असल्यामुळे मुबलक शेतजमिनी होत्या. परंतु आता या शेतजमिनींचे तुकडे झाले असून, काहीजण भूमिहीन झाले आहेत. त्यामुळे इतर कामांसह रोजंदारीवर समाजबांधव काम करत आहेत. तसेच शिक्षण व नोकऱ्यांमध्येही मराठा समाज मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणनेवेळी धर्म हिंदू, जात मराठा, उपजात कुणबी तर मातृभाषा मराठीचा उल्लेख करावा, असे आवाहन सकल मराठाच्या सभेमध्ये करण्यात आले. सकल मराठा समाज बेळगावतर्फे रविवारी मराठा मंदिर येथे सर्वपक्षीय  सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील नेते मंडळींनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त करून मराठा समाजाच्या मागण्या मांडल्या. पहिल्यांदाच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित राहिल्याने मराठा समाजाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

अॅड. अमर येळ्ळूरकर म्हणाले, कुणबी म्हणजे शेतकरी, कष्टकरी या अर्थाने हा शब्द वापरण्यात आला. सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाजाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या समाजाला प्रतिनिधीत्व देण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. 1993 च्या गॅझेटनुसार कुणबीला आरक्षण देण्यात आले होते. त्यामुळे मराठा समाजाला येत्या जातनिहाय जनगणनेमध्ये संधी असून, प्रत्येकाने योग्य त्या नोंदी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. भाजप नेते किरण जाधव यांनी बेंगळूर येथे झालेल्या बैठकीचा आढावा घेत आरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. राज्यातील मराठा समाज बेंगळूर येथे एकत्र येतो, मग बेळगावमधील सर्वपक्षीय समाजाने एकत्र का येऊ नये, या उद्देशाने सकल मराठा समाजाने एकत्रित येण्याचा निर्णय घेतला, असे नागेश देसाई यांनी सांगितले. अॅड. एम. जी. पाटील यांनी प्रत्येक गाव व घरापर्यंत जागृती करण्याचे आवाहन केले.

Advertisement

मराठा समाजाची एकी महत्त्वाची

राज्यात 50 लाखांहून अधिक मराठा समाज असताना सरकार दरबारी मात्र 15 ते 16 लाखच नोंद आहे. इतर जातीबांधवांनी मराठा ऐवजी आरक्षणासाठी इतर जातींचा उल्लेख केल्यामुळे ही संख्या कमी झाली आहे. त्यामुळे यापुढे एकत्र राहण्यासाठी मराठा व कुणबी ही नोंद असणे गरजेचे असल्याचे प्रकाश मरगाळे यांनी स्पष्ट केले. मराठा समाज मूळचा शेतकरी असल्यामुळे त्यांनी कुणबी असाच उल्लेख करावा, असे आवाहन माजी आमदार अंजली निंबाळकर व माजी आमदार अनिल बेनके यांनी स्पष्ट केले. संजय सातेरी, अमित देसाई, रमाकांत कोंडुसकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सागर पाटील, महादेव पाटील, शिवराज पाटील यांनी केले.

जागृती पत्रकांचे वाटप

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मराठा बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, एम. जी. पाटील, माजी उपमहापौर रेश्मा पाटील, रेणू किल्लेकर व रावजी पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. कार्यक्रमाच्या शेवटी जागृती पत्रकांचे वितरण करण्यात आले. शरद पाटील, नागेश देसाई, जयराज हलगेकर, रमेश गोरल, आर. एम. चौगुले, रणजित चव्हाण-पाटील, सुधा भातकांडे, शिवानी पाटील, दिगंबर पवार यांच्या हस्ते पत्रकांचे प्रकाशन करण्यात आले.

Advertisement
Tags :

.