For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुणेरी विद्यार्थ्याना उत्कृष्ट निकाल देणाऱ्या सिंधुदुर्ग पॅटर्नचे आकर्षण

12:38 PM Dec 01, 2023 IST | अनुजा कुडतरकर
पुणेरी विद्यार्थ्याना उत्कृष्ट निकाल देणाऱ्या सिंधुदुर्ग पॅटर्नचे आकर्षण
Advertisement

सीमाभागातील पुणेस्थित उद्योजकांतर्फे आयोजित शैक्षणिक व्याख्यानमालेत राज्य पुरस्कारप्राप्त पांडुरंग काकतकर यांचे व्याख्यान

Advertisement

न्हावेली / वार्ताहर

पुणे उद्योजक मित्रमंडळ , ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान,आणि धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने धारेश्र्वर विद्या व कला प्रतिष्ठान हॉल धायरी, पुणे येथे आयोजित दहावीच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शनपर व्याख्यानमालेचे उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तथा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांच्या विज्ञान विषयाच्या अभ्यासपूर्ण व तंत्रयुक्त व्याख्यानाने विदयार्थी मंत्रमुग्ध झाले. त्यामुळे अतिथी महोदयांसह पुणेरी विद्यार्थी राज्यात अव्वल दर्जाचा निकाल देणाऱ्या सिंधुदूर्ग पॅटर्नच्या प्रेमात पडले. सदर व्याख्यानमालेसाठी मंडळाने महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे निवडक तज्ञ मार्गदर्शक निवडले असून त्यात सिंधुदुर्गतील उपक्रमशील विज्ञान शिक्षक पांडुरंग काकतकर यांची निवड झाली आहे. व्याख्यानमालेत प्रत्येक रविवारी विज्ञान, गणित व इंग्रजी या विषयांचे मार्गदर्शन होणार आहे.

Advertisement

एकीकडे शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यासारख्या ठिकाणी उद्योग विश्वात नावलौकिक मिळविलेल्या बेळगावकर उद्योजकांनी सामाजिक जाबाबदारीची जाणीव ठेऊन असा नाविन्यपूर्ण दर्जेदार शैक्षणिक उपक्रम राबविणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत धारेश्र्वर विद्या व क्रिडा प्रतिष्ठान पुणेचे संस्थाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे काकासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केले.

ग्रामीण सीमाभागात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून मातृभूमी तसेच कर्मभूमी यांची सेवा यापुढेही अशाच पद्धतीने करण्यास मंडळ सदैव तत्पर राहील असे मत पिटर डिसोजा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. तसेच व्याख्यानमालेचा दर्जा टिकवणे व त्याचा लाभ गरजू विद्यार्थ्यांना करवून देणे यासंबंधीची आपणां सर्वांची जबाबदारी आता वाढली असून असेच व्यवस्थित नियोजन केल्यास प्रायोगिक तत्वावर सुरु केलेली ही व्याख्यानमाला पुण्यामध्ये लौकिकास पात्र ठरेल. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले.

मंडळाचे सचिव सन्मा. शिवाजीराव जळगेकर, उपक्रमास यथोचित साथ देणारे ज्येष्ठ उद्योजक लक्ष्मणराव काकतकर , रामचंद्र निलजकर उपक्रमाचे योग्य नियोजन करण्यासाठी पूर्ण योगदान दिलेले व्याख्यानमाला उपक्रमाचे अध्यक्ष परशुराम निलजकर, खानापूर - बेळगाव मित्र मंडळाचे संचालक सुरेश हलगी, केशव जवळीकर,रामचंद्र बाळेकुंद्री, बाळकृष्ण पाटील, नारायण गावडे, बाळू मशनुचे, बी. पी. एल. फाउंडेशन अध्यक्ष दत्ता भेकणे, माजी अध्यक्ष केदार शिवणगेकर, के.पी.एल.चे अध्यक्ष रामू गुंडप,धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे संस्था संचलित कै.बं.खं.विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास खाडे सर, कै.ना.बं.चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव काकडे सर, प्रशालेचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल धारेश्वर विद्या व क्रिडा प्रतिष्ठान तसेच खानापूर बेळगांव मित्रमंडळ यांच्यातर्फे व्याख्यानमालेचे तज्ञ मार्गदर्शक पांडुरंग काकतकर यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा खरे प्रास्ताविक केशव जवळीकर यांनी केले तर आभार परशुराम नीलजकर यांनी मानले.

Advertisement
Tags :

.