For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Gavkhadi beach | काळाचा घाला! लेकरांना वाचवण्यासाठी बाप अथांग समुद्राशी भिडला, पण काळजाचा तुकडा हिरावला

01:39 PM Apr 14, 2026 IST | NEETA POTDAR
gavkhadi beach   काळाचा घाला  लेकरांना वाचवण्यासाठी बाप अथांग समुद्राशी भिडला  पण काळजाचा तुकडा हिरावला
Advertisement

                          गावखडी समुद्रकिनाऱ्यावर हृदयद्रावक दुर्घटना

Advertisement

आष्टा -रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गावखडी समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी फिरावयास आलेल्या कुटुंबाबर काळाने घाला घातला. खोल समुद्रात लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या मुलांना वाचवण्यासाठी एका पित्याने अथांग समुद्राशी दोन हात केले.

मुलीला आणि पुतण्याला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले, मात्र दुर्दैवाने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवताना त्यांना अपयश आले. श्रेयश सागर गोसावी (वय १३) मूळगाव तांदुळवाडी या शाळकरी मुलाचा या घटनेत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्णरत्नागिरीसह सांगली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी तांदुळवाडी येथे शोककळा पसरली आहे.

Advertisement

सागर मोहन गोसावी हे मूळचे सांगली जिल्ह्यातील तालुक्यातील तांदुळवाडी येथील रहिवासी बाळबा आहेत. व्यवसायानिमित्त ते सध्या रत्नागिरीतील मेर्वी येथे वास्तव्यास आहेत.शुक्रवारी दुपारी शाळा लवकर सुटल्याने मुलांच्या आग्रहाखातर सागर गोसावी मुलगा श्रेयश, मुलगी आरोही आणि पुतण्या देवराज यांना घेऊन गावखडी येथील सुरूच्या बनात फिरण्यासाठी गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास मुले समुद्राच्या फेसाळणाऱ्या पाण्यात खेळत होती.मात्र, समुद्राला आलेल्या भरतीमुळे पाण्याचा ओघ वाढला. अचानक आलेल्या लाटांच्या ओढीमुळे तिन्ही मुले खोल पाण्यात खेचली जाऊ लागली.

मुलांना पाण्यात गटांगळ्या खाताना पाहून सागर गोसावी यांनी क्षणाचाही विचार न करता समुद्रात झोकून दिले. आपल्या डोळ्यांसमोर मुलांचा काळ दिसू लागल्याने एका बाजूला समुद्राच्या आक्राळविक्राळ लाटा आणि दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेम असा संघर्ष सुरू झाला. जिवाची बाजी लावत सागर यांनी आधी आरोही आणि देवराज यांना सुरक्षितपणे खेचत किनाऱ्यावर आणले. मात्र, जेव्हा ते पुन्हा श्रेयशला वाचवण्यासाठी लाटांच्या दिशेने वळले,तोपर्यंत काळ सरसावला होता. श्रेयश लाटांच्या प्रवाहासोबत खोल समुद्रात ओढला गेला आणि दिसेनासा झाला.

घटनेची माहिती मिळताच पूर्णगड सागरी पोलीस, स्थानिक पोलीस पाटील आणि गावखडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शुक्रवारी उशिरापर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली, परंतु वाढता अंधार आणि समुद्राचे उधाण यामुळे शोधकार्यात अडथळे आले. शनिवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास श्रेयशचा मृतदेह गावखडी किनाऱ्यावर तरंगताना आढळून आला.

Advertisement
Tags :

.