दिल्लीतील वातावरण अचानक बदलले
सोसाट्याचे वादळ, मुसळधार पावसामुळे 15 विमाने वळविली
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली-एनसीआरमधील दृश्य शुक्रवारी संध्याकाळी अचानकच बदलले. जोरदार वादळानंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने उष्णतेने त्रस्त असलेल्या राजधानीतील लोकांना अचानक दिलासा मिळाला. मात्र, घराबाहेर असलेल्या लोकांना वाहतूक कोंडीचा व वाऱ्या-पावसाचा फटका बसला. अनेक भागात जोरदार धुळीचे वारे वाहत होते. तसेच विजाही चमकत होत्या. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार वादळ आणि पावसाचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला. खराब हवामानामुळे 15 हून अधिक उ•ाणे इतर विमानतळांवर वळवावी लागली. अनेक विमाने उशिराने रवाना करण्यात आली. तर काही विमाने जयपूर, लखनौ आणि अमृतसर सारख्या जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आली. दिल्ली आणि जयपूरमध्ये धुळीच्या वादळामुळे लँडिंग आणि टेकऑफमध्ये अडचणी येत आहेत. यामुळे, केवळ विमानांचे मार्गच वळवले जात नाहीत तर हवाई वाहतूक कोंडीही वाढल्याचे आघाडीची विमान कंपनी इंडिगोने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
एकीकडे पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला असतानाच दुसरीकडे अनेक भागात वाहतूक कोंडी झाली. मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. हवामान खात्याने पुढील 24 तासांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.