महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

साहाय्यक अभियंताच बनला मनपाचा आयुक्त!

12:10 PM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तर विभागाच्या अभियंत्याने केला दक्षिण विभागाच्या क्षेत्रात हस्तक्षेप : अधिकार नसताना तब्बल चार मजली इमारतीसाठी दिली परवानगी

Advertisement

बेळगाव : शहरामध्ये इमारत बांधताना परवानगी देण्यासाठी महानगरपालिकेला राज्य नगर पंचायतीच्या कायद्यानुसारच काम करावे लागते. मात्र महानगरपालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अभियंत्याने सर्व नियम मोडून दक्षिण विभागातील काहीजणांना तब्बल चार मजली इमारत बांधण्यासाठी परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरू असून त्याठिकाणी संबंधित घर मालकाने आम्हाला महानगरपालिकेनेच परवानगी दिली आहे. त्यामुळे आमचा यामध्ये काहीच दोष नसल्याची साक्ष न्यायालयासमोर दिल्याने महानगरपालिकेला मोठा दणका बसला आहे.

Advertisement

दोन मजली इमारत बांधण्यासाठी परवानगी देण्याचा अधिकार साहाय्यक अभियंत्यांना आहे. त्यापेक्षा अधिक मजले बांधायचे असतील तर त्याची परवानगी आयुक्तांनी दिली पाहिजे. मात्र उत्तर विभागामध्ये काम करत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्याने दक्षिण विभागामध्ये घरे बांधण्यासाठी तेही चार मजले उभे करण्यासाठी परवानगी दिली आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून ही परवानगी दिली आहे. त्यामुळे महानगरपालिका चांगलीच अडचणीत आली आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांकडे विचारणा केली असता, सदर खटला उच्च न्यायालयात सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र उच्च न्यायालयामध्ये संबंधित घर मालकाने आपली बाजू मांडताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चूक आहे, आम्ही रितसर चार मजली इमारतीची परवानगी मागितली होती. त्यानंतर आम्हाला ती परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसारच आम्ही इमारत उभी केली आहे. हवे तर आपले दोन मजले पाडा. मात्र आम्ही केलेला खर्च आम्हाला द्या, असा युक्तिवाद उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.

या प्रकरणाबाबत महानगरपालिकेच्या कायदा सल्लागारांशी विचारणा केली असता, याबाबत मला काहीही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. हे प्रकरण आयुक्तांच्या अखत्यारित येते. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करा, असे सांगण्यात आले. एकूणच हे प्रकरण महानगरपालिकेच्या अंगलट आले आहे. एकूण चार जणांना अशाप्रकारे संबंधित अभियंत्याने परवानगी दिली आहे. सध्या या प्रकरणातून त्यांची इतरत्र बदली करण्यात आली असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.

 मनपा लक्ष देणार का?

चार मजली इमारत उभारणीसाठी परवानगी दिल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ अभियंत्यांनी व अधिकाऱ्यांनी संबंधित साहाय्यक अभियंत्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र हे एकच प्रकरण नाही तर चार जणांना परवानगी दिल्याचे उघडकीस आल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. महत्त्वाचे म्हणजे उत्तर विभागाचे अभियंता असताना दक्षिण विभागातील इमारतींना परवानगी देण्याचा प्रताप संबंधित अभियंत्याने केला आहे. ‘मंजुळ’ आवाजात बोलून ही परवानगी दिली का? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. या प्रकाराकडे महानगरपालिका आयुक्त, महापौर व नगरसेवक लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article