अकरा दिवस अगोदरच मान्सूचे आगमन
केरळनंतर एकाच दिवसात पोहोचला गोव्यात : 29 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी, नंतर येलो
पणजी : नैऋत्य मान्सून अखेर तब्बल 11 दिवस अगोदर गोव्यात पोहोचला. वार्षिक सरासरीप्रमाणे पाच जूनला तो गोव्यात पोहोचायचा, मात्र यंदा पंचवीस मे रोजी पोहोचला. गोव्याबरोबरच तो महाराष्ट्राच्या कोकण विभागातदेखील पोहोचला. दरम्यान पुढील तीन दिवस पणजी वेधशाळेने गोव्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असून जोरदार पावसाची शक्मयता व्यक्त केली आहे. मान्सून गोव्यात पोचला तरी पहिल्या दिवशी मात्र पावसाचे प्रमाण त्या तुलनेत फार मर्यादित राहिले गेल्या चार दिवसाच्या जोरदार पावसानंतर शनिवारी पावसाचे प्रमाण बरेच खाली उतरले. काल रविवारी मान्सूनचे गोव्यात दरवर्षापेक्षा 11 दिवस अगोदरच आगमन झाले. रविवारी दिवसभर बऱ्याच ठिकाणी तुरळक सरी पडून गेल्या. मात्र गेल्या तीनचार दिवसांसारखा मुसळधार पाऊस पडला नाही.
एकाच दिवसात पोचला गोव्यात
हवामान खात्याने काल रविवारी दुपारीच मान्सून गोव्यात पोहोचल्याचे जाहीर केले. गेले चार दिवस गोव्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. कमी दाबाच्या पट्ट्याबरोबरच मान्सून देखील अति वेगाने गोव्यात पोचला. शनिवारी केरळमध्ये पोहोचलेला मान्सून रविवारी गोव्यात पोचला, पण असे कधी होत नव्हते. परंतु यंदा हा मान्सून असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यामुळे केरळमधून 24 तासात मान्सून गोव्यात पोहोचला हे वैशिष्ट्या आहे.
मान्सूनच्या आगमनाचा बदल आश्चर्यकारक
साधारणत: दरवषी केरळमध्ये 31 मे च्या दरम्यान मान्सून पोचतो. त्यानंतर बरोबर पाचव्या दिवशी मान्सून गोव्यात सलामी देतो. मात्र यंदा केरळातही मान्सून लवकर पोहोचला आणि एका दिवसात तो गोव्यात पोचला. यंदाचा हा बदल आश्चर्यकारक आणि अनेक शास्त्रज्ञांना विचार करायला लावणारा ठरतो. मात्र नैऋत्य मान्सूनच्या पहिल्या दिवशी गोव्यात पावसाचे प्रमाण त्या तुलनेत कमीच राहिले.
मान्सूपूर्व पाऊस झाला 20 इंच
गेल्या 24 तासात सर्वाधिक पावसाची दोन इंच नोंद काणकोणमध्ये झाली. फोंड्यामध्ये देखील दोन इंच, पणजीत दीड इंच, जुने गोवे दीड इंच, म्हापसा व मडगाव येथे प्रत्येकी एक इंच, सांगे, धारबांदोडा, सांखळी, मुरगाव येथे प्रत्येकी पाऊण इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे एक सेंटीमीटर तर दाभोळी आणि पेडणे येथे त्यापेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला. यामुळे गेल्या 24 तासातील पावसाची सरासरी नोंद ही एक इंच झालेली आहे. यंदा एक मार्चपासून आतापर्यंत 20 इंच पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये 19 इंच पाऊस हा गेल्या पाच दिवसांचा होता.
गोव्यात 29 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने सायंकाळी जारी केलेल्या माहितीनुसार 25 मे पासून 29 मे पर्यंत गोव्यात ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. यादरम्यान जोरदार पाऊस कोसळेल, शिवाय गडगडाट आणि वादळी वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 55 किलोमीटर एवढा राहील. दि. 30 आणि 31 मे रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, त्यासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे दरम्यान या पावसामुळे राज्यातील उष्णतेचा पारा खाली उतरला आहे. कमाल तपमान 29 डिग्री तर किमान तापमान 25 अंश एवढे राहिले. सध्या समुद्र खवळलेला आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.