For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपूर्व उत्साहात गणरायाचे आगमन

08:01 AM Sep 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
अपूर्व उत्साहात गणरायाचे आगमन
Advertisement

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या साथीने घरोघरी-सार्वजनिक मंडपांमध्ये गणराय विराजमान

Advertisement

अपूर्व उत्साहात, गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या साथीने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये गणरायाचे आगमन झाले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरामध्ये उत्साही, मंगलमय, चैतन्य पर्वाला प्रारंभ झाला आहे. आता यापुढे अनंत चतुर्दशीपर्यंत सामूहिक आरती, मंत्रपुष्पांजली, प्रसाद वितरण, विविध स्पर्धा असे वातावरण पाहायला मिळणार आहे.

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : गणेशोत्सव म्हणजे अनेक हातांना काम देणारा उत्सव. सजावटीच्या साहित्यापासून पूजा साहित्यापर्यंत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या खिशात काही पैसे खुळखुळण्याचेच हे दिवस. त्यामुळे साधारण महिनाभर आधीपासूनच बाजारपेठेत सजावटीच्या साहित्याची चाहूल लागली होती. गेला आठवडा तर बेळगावकरांनी केलेल्या खरेदीमुळे आणि खरेदीसाठी गोवा व कोकणातून बेळगावला आलेल्या भाविकांमुळे शहरातील बाजारपेठांमध्ये तुडुंब गर्दी झाली होती.

अलीकडे गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असताना उपनगरांमध्ये टिळकवाडी, अनगोळ, शहापूर, सदाशिवनगर, महांतेशनगर, हनुमाननगर येथेही विक्रेते सजावटीसह पूजा साहित्य घेऊन पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गर्दीमध्ये येण्याचे टाळणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे. तथापि, गणपत गल्ली आणि पांगुळ गल्लीने गर्दीचा उच्चांकच गाठला आणि पोलिसांची जणू परीक्षाच पाहिली.

सोमवारी सकाळी घरोघरी गणरायाचे आगमन झाले. काही कुटुंबांमध्ये, तसेच मंडपांमध्ये श्रीमूर्ती आधीच आणून ठेवण्यात आली होती. काही घरांमध्ये यजमानांनीच श्रीगणेश पूजा केली. तर ज्यांना भटजींकडून पूजा करून घ्यावयाची होती त्यांना मात्र भटजीबुवांची प्रतीक्षा करावी लागली. एका घराची पूजा करून दुसरीकडे जाताना भटजींचीही तारांबळ उडाली. पूजा, आरती, उकडीचे किंवा तळणीचे मोदक, पुरणपोळी, खिर अशा पक्वान्नांचा आस्वाद घेऊन तरुणाई सार्वजनिक मंडपाकडे वळली.

सायंकाळपर्यंत घरोघरचे गणपती आणण्याची लगबग सुरूच होती. काही ठिकाणी ट्रॅक्टर किंवा टेम्पोमध्ये एकाच गल्लीतील किंवा गावातील अनेकांनी श्रीमूर्ती ठेवून वाजतगाजत आपल्या गावात किंवा आपल्या घरी नेऊन त्यांची प्रतिष्ठापना केली. विशेष म्हणजे यंदा पारंपरिक वाद्याला मागणी वाढली होती. बहुसंख्य ठिकाणी या वाद्यांच्या साथीने घरोघरी गणरायाचे स्वागत करण्यात आले.

भाज्यांना मागणी

काही विशिष्ट समाजामध्ये गणरायाच्या आगमनादिवशी अनेक भाज्या प्रामुख्याने किमान 16 भाज्या घालून खतखते हा पदार्थ केला जातो. यामध्ये बाजारात नेहमी मिळणाऱ्या भाज्यांबरोबरच अळूच्या मुडल्या, कणीस, मिळाल्यास सुरण, फागले आणि काही रानभाज्या यांचा समावेश असतो. सर्व भाज्या उकडून त्याला मीठ-मिरचीचे वाटण आणि तुपाची फोडणी दिल्याने हा पदार्थ अतिशय रुचकर लागतो. अर्थातच बाजारपेठेत भाज्यांची आवक वाढली. परिणामी दरामध्येही किंचित वाढ झाली.

आरास सजावटीने उत्साह दुमदुमला

गणरायाच्या आगमनाने भक्तिमय वातावरण

मिरवणुका काढून गणेशमूर्तींचे स्वागत

Advertisement
Tags :

.