For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उष्म्यात तापला राजकारणाचा आखाडा

06:30 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
उष्म्यात तापला राजकारणाचा आखाडा
Advertisement

कर्नाटकात दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा एप्रिलमध्ये आणखी तापमान वाढणार, जून अखेरपर्यंत उकाडा असणार आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे. देशातील अनेक राज्यांत पुढील अडीच ते तीन महिन्यात उन्हाच्या झळा वाढणार असा त्यांचा अंदाज आहे. उत्तर कर्नाटकातही उष्णतेच्या लाटा येण्याचा धोका तज्ञांनी व्यक्त केला आहे. एकीकडे वाढता उकाडा तर दुसरीकडे दुष्काळी स्थिती आणखी बिकट होत चालली आहे. संपूर्ण राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत हे मूळ प्रश्न बाजूला पडले आहेत. उष्म्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. तरीही निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कर्नाटकातील 28 पैकी 14 मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Advertisement

उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर उफाळलेल्या पक्षांतर्गत असंतोषावर इलाज करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मंगळवारी कर्नाटकात आले होते. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व त्यांचे बंधू बेंगळूर ग्रामीणचे उमेदवार डी. के. सुरेश यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बेंगळूर ग्रामीणमध्ये निजदचे नेते व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यासमवेत त्यांनी रोड शो केला. कर्नाटकात भाजप-निजदची युती आहे. ही युती आजवर दिल्लीपुरती होती, गल्लीत ती रुजली नव्हती. म्हणून आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या गळ्यात ही युती उतरविण्यासाठी अमित शहा यांनी निजद नेत्यांबरोबर रोड शो केला आहे. बेंगळूर ग्रामीणचे भाजपचे उमेदवार डॉ. सी. एन. मंजुनाथ हे प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे ते जावई आहेत. डी. के. शिवकुमार यांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी डॉ. मंजुनाथ यांच्या माध्यमातून भाजप-निजद युतीने एक चांगला चेहरा लोकांसमोर आणला आहे. त्यांच्या विजयासाठी केवळ भाजपच नव्हे तर निजद नेत्यांनीही कंबर कसली आहे.

आपल्या एक दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यात अमित शहा यांनी बंडोबांना थंड करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून जे नेते आपल्याच पक्षावर नाराज होते. प्रसंगी बंडाच्या तयारीत होते, त्यांच्याशी अमित शहा यांनी थेट संवाद साधला आहे. या संवादामुळे काही ठिकाणचे बंड तूर्त थंड झाले आहे. चिक्कबळ्ळापूरमधून आपल्या मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आमदार एस. आर. विश्वनाथ हे बंडाच्या तयारीत होते. चिक्कबळ्ळापूरचे भाजपचे उमेदवार डॉ. सुधाकर हे त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत गेले त्यावेळी विश्वनाथ यांनी त्यांची भेट टाळली होती. प्रवेशद्वारावरूनच सुधाकर यांना माघारी जावे लागले होते. अमित शहा यांनी दिलेल्या एका सूचनेनंतर विश्वनाथ यांच्या निवासस्थानी नाष्टा करण्यात आला. त्याला सुधाकर यांच्यासह इतरांनाही बोलाविण्यात आले. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या एकाधिकारशाही व घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्ध दंड थोपटलेले के. एस. ईश्वरप्पा यांनाही चर्चेसाठी दिल्लीला बोलाविण्यात आले आहे.

Advertisement

जेणेकरून बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न पक्षाने हाती घेतले आहे. भाजपने तर बेंगळूर ग्रामीणवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात कर्नाटकाला ठेंगा दाखविण्यात आल्याचा ठपका ठेवत खासदार डी. के. सुरेश यांनी स्वतंत्र देशासाठी लढा उभा रहावा लागेल, अशी घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश विभाजनाची भाषा करणाऱ्या डी. के. सुरेश यांच्यावर टीकेची झोड उठविली. भाजपने हा प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. ज्यांनी देश विभाजनाची भाषा केली त्यांच्यावर काँग्रेसने कोणतीच कारवाई केली नाही. उलट लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी दिली आहे, असे उत्तराखंडमधील निवडणूक प्रचारात पंतप्रधानांनी म्हंटले आहे. यावरून डी. के. बंधूंच्या साम्राज्यावर भाजप-निजद युती निवडणुकीत तुटून पडणार हे स्पष्ट झाले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने निधी दिला नाही. कर्नाटकासह दक्षिणेतील राज्यांवर सतत केंद्राकडून अन्याय केला जात आहे. अशा परिस्थितीत कर्नाटकात येऊन मते मागण्याचा अमित शहा यांना नैतिक अधिकार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीका केली आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने प्रस्ताव पाठवताना तीन महिने उशिरा पाठविला आहे. त्यामुळेच भरपाई मिळाली नाही असे सांगत या परिस्थितीला त्यांनी काँग्रेसला सरकारलाच जबाबदार ठरविले आहे.

कर्नाटकातील सर्व 28 जागांवर विजय मिळविण्यासाठी भाजप-निजदची व्यूहरचना झाली आहे. यासाठीच भाजप-निजद नेत्यांची संयुक्त बैठकही झाली आहे. कर्नाटकात भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी काँग्रेसनेही तयारी केली आहे. काँग्रेसची भिस्त पाच गॅरंटींवर आहे. मोफत बस प्रवास व कुटुंब प्रमुख महिलेला दरमहा 2000 रुपये, मोफत वीज, अन्नभाग्य आदी योजनांमुळे कर्नाटकातील मतदार खासकरून महिला मतदार आपली साथ सोडणार नाहीत, याचा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटतो. निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या वरुणा मतदारसंघातील मतदारांना भावनिक साद घातली आहे. चामराजनगर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुनील बोस हे मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा यांचे चिरंजीव आहेत. वरुणामधून किमान 60 हजारांचे मताधिक्य त्यांना मिळाले तर आपल्याला कोणीही हात लावू शकत नाही. मुख्यमंत्री पदावर आपण हवे की नको? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे जर कर्नाटकात काँग्रेसला कमी जागा मिळाल्या तर सिद्धरामय्या यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याची पुन्हा घोषणा केली आहे. गेल्या निवडणुकीतच यापुढे आपण राजकीय संन्यास घेणार असे जाहीर केले होते. कार्यकर्त्यांच्या दबावाखातर ही निवडणूक लढविली आहे. आपल्या सरकारला चार वर्षे पूर्ण होणार त्यावेळी आपण 83 वर्षांचे होणार आहोत. आपले शरीर किती साथ देते, हे आपल्यालाच माहित असते. त्यामुळेच सक्रिय राजकारणाला रामराम ठोकणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तावाटपात अडीच वर्षांचा फार्म्युला ठरला होता. अडीच वर्षानंतर डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्याचे ठरले आहे. अधुनमधून सिद्धरामय्या व शिवकुमार गटातील नेते यासंबंधी जाहीर वक्तव्य करीत असतात. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधील सत्तासंघर्ष आणखी वाढणार याची लक्षणे दिसू लागली आहेत. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी वरुणामधील मतदारांना भावनिक साद घातली असणार का?

Advertisement
Tags :

.