मनपा प्रवेशद्वारासमोरच तलावाचे स्वरुप
अधिकारी लक्ष देणार का? : दुचाकी पार्किंग करणे अवघड
बेळगाव : शहराची देखभाल करणाऱ्या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच पावसामुळे तलावाचे स्वरुप निर्माण झाले आहे. यापूर्वीही झालेल्या पावसामुळे त्या ठिकाणी पाणी साचून होते. मात्र याबाबत महानगरपालिकेने गांभीर्याने घेतलेच नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे प्रवेशद्वारासमोरच पाणी साचून आहे. त्या परिसरात दुचाकी पार्किंग करणे अवघड झाले आहे. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच ही परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे यावरून शहराची अवस्था काय असणार? हे समजून येते. अलिकडेच महानगरपालिकेची इमारत बांधण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या आवारात पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. मात्र ते पेव्हर्स योग्य प्रकारे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी पाणी साचून आहे. याकडे आता महापालिका आयुक्त तसेच इतर अधिकारी गांभीर्याने लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे. आता लवकरच मान्सूनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सतत पाऊस पडणार असल्याने तातडीने त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा साचून राहिलेल्या पाण्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागणार आहे. महानगरपालिकेच्या या आंधळ्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.