'अतिक्रमण हटाव'ची गाडी नो हॉकर्स झोनमध्ये तळ ठोकून
सातारा :
सातारा नगरपलिकेने मोती चौक ते पाचशे एक पाटी या दरम्यान नो हॉकर्स झोन केलेला आहे. त्या नो हॉकर्स झोनमध्ये किरकोळ विक्रेते आपली दुकाने लावत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे पथक बुधवारी कारवाईसाठी गेले होते. परंतु हॉकर्सधारकांनी आपली दुकानेच लावली नव्हती. त्यानंतर गुरुवारीही सकाळपासून अतिक्रमण हटाव विभागची गाडी नो हॉकर्स झोनमध्ये तळ ठोकून होती. त्यामुळे एकाही किरकोळ विक्रेत्याने आपले दुकान लावले नव्हते. रस्त्याला शुकशुकाट दिसत होता.
मोती चौक ते पाचशे एक पाटी या दरम्यान नो हॉकर्स झोन करण्यात आला आहे. त्याच नो हॉकर्स झोनमध्ये दुकानदार आपली दुकाने लावत असल्याने व तेथील काहीच्या तक्रारी झाल्याने बुधवारी पालिकेचे पथक कारवाईसाठी गेले होते. तत्पूर्वी त्यांनी आपली दुकाने लावली नव्हती. त्यांना अन्य जागा देण्यासाठी पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्यासमोर चर्चा झाली. त्या जागेची पाहणीही करण्यात आली होती.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळपासून नो हॉकर्स झोनमध्ये अतिक्रमण हटाव विभागाची गाडी उभी होती. त्यामुळे एकाही किरकोळ विक्रेत्याने आपले दुकान लावले नव्हते. त्यामुळे मोती चौक ते पाचशे एक पाटी हा रस्ता मोकळा मोकळा होता. तसेच याच रस्त्याच्या कडेने व्यापाऱ्यांच्या जाळ्या दिसत होत्या. त्या जाळ्या काढण्यात याव्यात, अशीही सातारकरांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.