उद्या माजगावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव
महिला व माहेरवाशिणींसह भाविकांची होणार अलोट गर्दी
ओटवणे;प्रतिनिधी
माजगावचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या रविवारी ४ जानेवारी रोजी होत आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी सातेरीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सातेरीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर उशिरा पार्सेकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच ग्राम देवस्थान निधी कमिटी आणि माजगाव ग्रामस्थानी केले आहे.