For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंदिराच्या पावित्र्यासाठी पशुबळी प्रथा बंद होणे आवश्यक

10:58 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंदिराच्या पावित्र्यासाठी पशुबळी प्रथा बंद होणे आवश्यक
Advertisement

विश्वप्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांचे प्रतिपादन : उचगाव येथील मळेकरणी देवी मंदिराला भेट देऊन भाविकांना केले मार्गदर्शन

Advertisement

वार्ताहर /उचगाव

पशुबळी दिल्यानंतरच आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात व देवी प्रसन्न होते, ही फक्त अंधश्रद्धा आहे. देवालयांचे पावित्र्य राखायचे असेल तर पशुबळी देण्याची प्रथा बंद होणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे कायद्यानेसुद्धा आता पशुबळी देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे उचगाव ग्रामस्थांनी मळेकरणी देवीच्या मंदिर परिसरात पशुबळी देण्याची प्रथा बंद करून क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, असे मत विश्वप्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी व्यक्त केले. उचगाव येथील जागृत मळेकरणी देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात पशुबळी दिले जात होते. उचगाव ग्राम पंचायत व ग्रामस्थांनी ही प्रथा पूर्णपणे बंद करून एकचजूट दाखविली. या संदर्भात ‘तरुण भारत’ने दयानंद स्वामी यांची प्रतिक्रिया घेऊन सविस्तर वृत्तांकन केले होते. उचगाववासियांचा हा निर्णय ऐतिहासिक असून आपण उचगावला येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी त्यांनी उचगावला येऊन मंदिराला भेट दिली व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Advertisement

ते म्हणाले, मंदिर किंवा अन्य कोणतीही धार्मिक स्थळे ही पूजापाठ आणि भक्ती करण्यासाठी आहेत. तेथे पशुबळी देऊन हत्या करण्याचे पाप कोणीही घेऊ नये. आता कायद्यानेसुद्धा पशुबळीला बंदी घातली आहे. त्यामुळे केवळ उचगावच नव्हेतर कर्नाटकमध्ये कोठेही पशुबळी प्रथा आढळल्यास आपण मला कळवा, कायद्यानुसार शिक्षा भोगण्यास तयार रहा, असे सांगितले. प्रारंभी उचगावमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ढोल ताशांच्या गजरात  भाविकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीने मळेकरणी देवीच्या आमराईकडे जाऊन येथील बळीपीठाची पाहणी केली. या ठिकाणी उपस्थित नागरिकांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर या सर्व परिसराची पाहणी करत त्यांनी मंदिरामध्ये जाऊन  देवीचे दर्शन घेतले. यथासांग पूजा केली. स्तोत्र पठण करून पुन्हा वाजत-गाजत आमराईकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारापासी असलेल्या सभामंडपामध्ये सर्वजण विराजमान झाल्यानंतर सभेला या ठिकाणी प्रारंभ करण्यात आला.

प्रारंभी उचगाव ग्राम पंचायतच्यावतीने आणि ग्रामस्थांच्यावतीने दयानंद स्वामी यांचा शाल पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. मात्र त्यांनी हा सन्मान माझ्यासाठी नसून उचगाव ग्राम पंचायतने केलेलेकार्य व ग्रामस्थांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय हा उचगावच्या आणि संपूर्ण भारत देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा असल्याचे सांगत ग्राम पंचायतच्या अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे आणि पीडीओ शिवाजी मडवाळ यांचा गावचे प्रथम नागरिक म्हणून त्यांनी सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, बी. एस होनगेकर, पी. एल. कदम, लक्ष्मण होनगेकर, बंटी पावशे, यादो कांबळे, संभाजी कदम, रामा कदम यासह ग्राम पंचायतचे सर्व सदस्य, सदस्या आणि ग्रामस्थांनी या सभेला उपस्थिती दर्शविली होती. या समारंभासाठी उचगाव आणि परिसरातील तुरमुरी, सुळगा, हिंडलगा, बेकिनकरे, बेनकनहळ्ळी अशा अनेक गावातील ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक एन. ओ. चौगुले यांनी केले. ग्रा. पं. सदस्य एल. डी. चौगुले यांनी आभार मानले.

स्वामीजींकडून ‘तरुण भारत’बद्दल कृतज्ञता

आपल्या उचगाव भेटीच्या दरम्यान दयानंद स्वामी यांनी ‘तरुण भारत’चे विशेष कौतुक केले. गेल्या 15 वर्षांपासून आपण राज्यातील ज्या ज्या शहरांमध्ये पशुबळी प्रतिबंध आंदोलन हाती घेतले तेव्हा तेव्हा ‘तरुण भारत’ या वृत्तपत्राने त्याची दखल घेतली आहे. उचगावच्या घटनेसंदर्भात तरुण भारतच्या पत्रकारांनीच माझ्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया विचारली. व घटनेचा पूर्ण तपशील सांगितला. त्यामुळे मी आज उचगावला आलो आहे, असे सांगून स्वामीजींनी ‘तरुण भारत’बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पशुहत्या बंद पाडल्याने सर्वांचे अभिनंदन

मळेकरणी देवीच्या परिसराबद्दल मी ऐकले होते. पशुबळी, मूकजनावरांची होणारी हत्या, तडफड, अहंकार, चित्कार मी ऐकले आहेत. आणि हेच पाप तुम्हाला कधीही माफ करणार नाही, हे सांगण्यासाठीच मी येथे आलो आहे. मात्र येण्यापूर्वीच येथील ग्रामस्थ, ग्राम पंचायतीने ही पशुहत्या बंद पाडली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, असेही स्वामी म्हणाले.

Advertisement
Tags :

.