अमेरिकन नौदलाने पाडले इराणी ड्रोन
अरबी समुद्रात अमेरिका-इराण संघर्ष : विमानवाहू जहाजाजवळ जाणारे ड्रोन पाडले
वृत्तसंस्था/ तेहरान, वॉशिंग्टन
अरबी समुद्रात एक इराणी शाहेद-139 ड्रोन अमेरिकन विमानवाहू जहाजाजवळ आक्रमकपणे पोहोचल्यानंतर पाडण्यात आल्याचे बुधवारी अमेरिकन लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. अमेरिकन नौदलाने अरबी समुद्रात विमानवाहू जहाजाजवळ येणारा एक इराणी ड्रोन पाडला आहे. तथापि, या घटनेवर इराणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ड्रोन अमेरिकन युद्धनौकेजवळ येत असताना त्याला धोका म्हणून पाहिले जात होते. गेल्या महिन्याभरात अमेरिकेने इराणभोवती आपली लष्करी तैनाती वाढवली आहे. त्यांनी डझनभर विमाने आणि जवळजवळ एक डझन युद्धनौका तैनात केल्या आहेत.
या आठवड्यात तुर्कीमध्ये अमेरिका-इराण अणु चर्चा सुरू होणार असताना ही घटना घडली आहे. इराणशी युद्ध टाळण्यासाठी चर्चा सुरू असतानाच हा संघर्ष झाला आहे. आम्ही कडक भूमिका घेऊ, परंतु शांतता ही आमची प्राथमिकता आहे, असे वक्तव्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मंगळवारी केल्यानंतर हा प्रकार घडला आहे. वृत्तसंस्थेनुसार, शाहेद-139 नावाच्या इराणी ड्रोनला अमेरिकेच्या एफ-35 लढाऊ विमानाने लक्ष्य करून हवेतच उद्ध्वस्त केले. इराणी सशस्त्र बोटींनी होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकन तेल टँकरला रोखण्याचा प्रयत्न केला. तथापि, टँकरने आपला वेग वाढवल्यानंतर अमेरिकन युद्धनौकांनी त्याला सुरक्षितपणे नेले.
26 जानेवारी रोजी अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन, तीन मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशकांसह, यूएस सेंट्रल कमांडच्या ऑपरेशनल क्षेत्रात दाखल झाली. सध्या ती अरबी समुद्रात तैनात आहे. अमेरिकेने या भागात अंदाजे आठ युद्धनौका तैनात केल्या असून त्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ तैनात असलेल्या विनाशकांचा समावेश आहे. या हालचाली अमेरिकन संरक्षण अधिक्रायांनी आणि उपग्रह प्रतिमांनी रेकॉर्ड केल्या आहेत.
खामेनींच्या इशाऱ्यानंतर अमेरिका आक्रमक
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अलिकडेच जर अमेरिकेने हल्ला केला तर संपूर्ण प्रदेश युद्धात भडकू शकतो असा इशारा दिला होता. त्यांनी इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांचे वर्णन अमेरिका आणि इस्रायल समर्थित बंड असे केले. इराणी जनता कोणत्याही धमक्यांना घाबरणार नाही. इराण कोणत्याही देशावर हल्ला करणार नाही, परंतु कोणत्याही आक्रमकतेला कडक प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. इराणी नेत्यांच्या या इशाऱ्यानंतर अमेरिकाही आक्रमक झालेली दिसत आहे.