Satara News : चोरे शिवारात आम्रवृक्ष मोहराने बहरले
फवारणी करून शेतकरी मोहर गळती रोखण्याचा प्रयत्न
चोरे : सध्या थंडीचे वातावरण असून ग्रामीण भागात शिवारात सर्वत्र आंब्यांची झाडे मोहराने गजबजून गेल्याचे चित्र दिसत आहे.शिवारात गावठी आंबे तसेच कलम केलेली विविध प्रकारची झाडे पिवळ्या सोनेरी रंगाच्या मोहराने फुलून गेली आहेत.
अलिकडच्या काळात ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात तोतापुरी, देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, पायरी अशा विविध संकरीत जातीसह इतर अनेक प्रकारची रोपे लागण करीत आहेत. शेताच्या बांधावर तसेच जनावरांच्या गोठ्याजवळ, परस बागेत कलम केलेली आंबा रोपे लागवड करून आर्थिक उत्पन्न घेताना लोक दिसत आहेत. पूर्वी संकरीत जातींचे फळ एप्रिल-मे महिन्यात खायला मिळायचे. आता ती परिस्तिथी राहिली नाही. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मार्च महिन्यात आंबा लोकांना चाखायला मिळत आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक शेतकरी एक- दोन आंबा रोपे तरी आपल्या शेतात लावत आहेत. शिवारात फेराफटका मारायला गेले तर मनमोहक असा मोहराचा सुगंध सर्वत्र दरवळत असल्यामुळे वातावरण आल्हादायक बनले आहे. पिवळा धमक मोहर आल्यामुळे यावर्षी लवकर चांगले फळ चाखायला मिळेल असे लोकांना वाटत आहे. काही शेतकरी मोहर गळती होऊ नये व चांगली फलधारणा व्हावी यासाठी फवारण्या करताना दिसत आहेत.