कुसमळी मलप्रभा नदीवरील पर्यायी रस्ता खचला
बेळगाव-चोर्ला रस्त्यावरील वाहतूक बंद : 15 दिवसांत दोनवेळा रस्ता खचल्याने वाहनधारकांची त्रेधातिरपीट
वार्ताहर/कणकुंबी
बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी पूल रविवारी दि. 8 रोजी सायंकाळी पुन्हा खचल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे रविवार दि. 25 मे रोजी जांबोटी कणकुंबी भागात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली होती. तसेच तोराळी, देवाचीहट्टी व आमटे येथील बंधाऱ्याच्या फळ्या काढल्याने पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ होऊन कुसमळी येथील मलप्रभा नदीतून बनवलेला पर्यायी रस्ता खचला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. रविवारी पुन्हा एकदा पर्यायी रस्ता खचल्याने सर्व वाहतूक बैलूर आणि खानापूरमार्गे वळविण्यात आली आहे.
या मार्गावरील कुसमळी येथील ब्रिटिशकालीन पूल काढून त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन पुलाला गेल्या पाच सहा महिन्यांपासून सुरुवात करण्यात आली आहे. परंतु पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम अर्धवट राहिल्याने नदीतून पर्यायी पूल बनविण्यात आला होता. या पर्यायी पुलावर पाण्याचा निचरा होण्यासाठी दहा पाईप घालण्यात आले होते. परंतु गेले दहा-बारा दिवस झालेल्या पावसामुळे मलप्रभा नदीचा पाण्याचा प्रवाह वाढल्याने तसेच तोराळी, देवाचीहट्टी व आमटे येथील बंधाऱ्याच्या फळ्या काढल्याने पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे पर्यायी पूल वाहून जाणार अशी भीती निर्माण झाली होती. त्यामुळे रविवार दि. 25 मे पासून हा मार्ग पूर्णपणे बंद केला होता. बेळगाव-जांबोटी गोवा अशी वाहतूक खानापूर व बैलूरमार्गे वळविण्यात आली होती.
परंतु पुन्हा दहा पाईप घालून पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. पुन्हा अशाच पद्धतीने सर्व वाहतूक बैलूर व खानापूरमार्गे वळविण्यात आल्याने वाहनधारकांची त्रेधातिरपीट होत आहे. मलप्रभा नदीवरील नूतन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नवीन पुलाला सुरुवात करण्यात आली आहे. वास्तविक, शासनाने टेंडर काढण्यास उशीर केला. तसेच भूगर्भशास्त्र खात्याने देखील ब्लास्टिंग करण्यास अनुमती दिली नाही. त्यामुळे पुलाचे काम सुरू करण्यास उशीर झाला आणि त्यामुळेच पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी अर्धवट राहिले.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली. तसेच तोराळी, आमटे आणि देवाचीहट्टी-हब्बनहट्टी दरम्यान मलप्रभा नदीवर असलेल्या बंधाऱ्याच्या फळ्या काढण्यात आल्याने पाण्याच्या प्रवाहात भरपूर वाढ झाली आणि त्यामुळे कुसमळी येथील मलप्रभा नदीवर बनवलेला पर्यायी पूल वाहून जाण्याची भीती निर्माण झाली होती. नवीन पुलाचे काम सुरू झाल्यापासून गेले चार-पाच महिने याच पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू होती. परंतु पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी अचानक बंधाऱ्यांच्या फळ्या काढण्याचा आततायीपणा केल्यामुळे मलप्रभा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली होती. त्यामुळे पंधरा दिवसात दोन वेळा पर्यायी रस्ता वाहून गेला. सध्या त्या ठिकाणी पर्यायी पुलाला पूर्वी दहा आणि त्यानंतर पुन्हा दहा पाईप असे एकूण वीस पाईप घालून पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असतानाही पुन्हा एकदा पर्यायी पुलावरील रस्ता खचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
विद्यार्थ्यांचे अतोनात हाल
या रस्त्यावरून बस वाहतूक बंद झाल्याने विशेषत: कॉलेज किंवा माध्यमिक शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना बेळगावला पोहोचण्यासाठी किंवा बेळगावहून घरी येण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा लागत आहे. तसेच पहिले एक दोन क्लास देखील चुकत आहेत. त्याचबरोबर बस कोणत्या मार्गाने ये जा करील याचाही भरवसा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
गोव्याला जाण्यासाठी पर्यायी तीन मार्ग उपलब्ध
बेळगाववरून गोव्याला जाण्यासाठी चोर्ला मार्गे हा अत्यंत जवळचा रस्ता झाला आहे. आता बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी पर्यायी तीन मार्ग उपलब्ध आहेत. खानापूरवरून जांबोटी मार्गे चोर्ला तसेच खानापूर-हेम्माडगा मार्गे अनमोड मात्र हा रस्ता सायंकाळी सहा ते सकाळी सात पर्यंत बंद असतो अथवा खानापूर-रामनगर अनमोड हे तीन पर्यायी रस्ते प्रवाशांना उपलब्ध आहेत. सध्या चोर्ला रस्त्याचे काम चांगले झाल्याने या रस्त्यावरून गोव्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. मात्र वाहनधारकांना या तीन मार्गांचा वापर करावा लागणार आहे.