सेल्फीचा मोह अन् संशयाचा डोह
पोलीस अधिकाऱ्याच्या शुभम शेळकेंसोबतच्या सेल्फीने उलटसुलट चर्चांना उधाण
प्रतिनिधी/ बेळगाव
पोलीस अधिकारी कधी काय करतील याचा नेम नाही. याचाच प्रत्यय शनिवारी म. ए. समितीच्या काळ्यादिनाच्या फेरीत आला. युवा समितीचे नेते शुभम शेळके यांच्याबरोबर आधी सेल्फी घेऊन नंतर त्याच अधिकाऱ्याने त्यांना ताब्यातही घेतल्याची घटना घडली. कन्नड संघटनांनी या प्रकरणानंतर सर्वत्र थयथयाट सुरू केला आहे. फेरीत सहभागी होण्यासाठी शुभम शेळके शनिवारी सकाळी संभाजी उद्यानात पोहोचले होते. याच ठिकाणी बंदोबस्तासाठी माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्चीही आले होते. फेरीत भाग घेण्यासाठी शुभम शेळके पूर्णपणे काळ्या पोशाखात आले होते. काळा फेटाही त्यांनी बांधला होता. अंगावर काळे कपडे व भारदस्त व्यक्तिमत्व पाहून त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी शुभम शेळके यांच्याबरोबर सेल्फी काढतानाचा व्हिडिओ शनिवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही माध्यमांनी या प्रकारावर टीका केली. शुभम म. ए. समितीचे युवानेते आहेत. त्यांच्यासोबत पोलीस अधिकाऱ्यांनी सेल्फी का काढावी? त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी होऊ लागली. एकीकडे समाजमाध्यमावर सेल्फीचा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच फेरीलाही सुरुवात झाली. दुपारी ही फेरी मराठा मंदिरजवळ पोहोचली. त्यावेळी शुभम शेळके यांच्या कारमध्ये दोन पोलीस शिरले. सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून आम्ही तुम्हाला ताब्यात घेत आहोत, असे सांगितले. या कारमागे मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांचे सरकारी वाहनही होते.
पोलिसांनी शुभम यांना गावभर फिरवून पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुतगट्टी घाट ओलांडून नेले. घटप्रभा नदीवरील पुलाजवळ कार थांबवून तुम्ही शहरात येऊ नका, जिल्ह्यात कोठेही जा, असे सांगत पोलीस आपल्या वाहनातून माघारी फिरले. सकाळी ज्यांनी सेल्फी घेतली, दुपारी त्यांनीच त्यांना ताब्यातही घेतले. या प्रकाराची दिवसभर चर्चा सुरू होती. या विषयावरून सध्या वादंग माजले आहे.
सेल्फीमागील गौडबंगाल काय?
ज्या माळमारुतीच्या पोलीस निरीक्षकांनी सेल्फी काढली, त्यांनीच शुभम यांना बेळगावातून तडीपार करण्याचा प्रस्तावही पोलीस आयुक्तांकडे नेला होता. अनेकवेळा शुभमवर त्यांनी कारवाईही केली आहे. शनिवारी सकाळी सेल्फी काढण्यामागचा उद्देश नेमका काय होता? खरोखरच त्यांना सेल्फी घ्यायचा मोह आवरला नाही की पुन्हा ताब्यात घेण्यासाठीची ही तालीम होती? याचा उलगडा झाला नाही. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली असून केवळ व्हिडिओवरून नेमके काय घडले? हे ठरवता येत नाही. संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.