‘दक्षिण’चा सर्वांगिण विकास हाच ध्यास
आमदार अमल महाडिक : तरुण भारत संवाद’कार्यालयास दिली सदिच्छा भेट
कोल्हापूर :
गेल्या पाच वर्षात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासकामे पूर्णपणे ठप्प आहेत. पाणी पुरवठ्यासारखी मुलभूत गरज देखील तत्कालिन आमदार पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे प्रत्येक गावात मुबलक पाणीपुरवठा, रस्ते यासह विविध विकास योजना राबवून दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करणार, अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी दिली.
नूतन आमदार महाडिक यांनी बुधवारी ‘तरुण भारत संवाद’ च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी विभागीय संपादक श्रीरंग गायकवाड, निवासी संपादक सुधाकर काशिद, जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) आनंद साजणे, जाहिरात व्यवस्थापक (शहर) मंगेश जाधव, प्रशासन अधिकारी राहूल शिंदे, वितरण व्यवस्थापक सचिन बरगे, मुख्य समन्वयक कृष्णात चौगले, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
महाडिक म्हणाले, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये शहर आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हद्दवाढीचा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवताना ग्रामीण जनतेसाठी दिलासादायक तोडगा काढून मार्गी लावला जाईल. अद्याप अनेक गावांत आणि उपनगरांत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे आगामी काळात पाणी पुरवठा योजना राबविल्या जातील. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार पुढील विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. जनतेने मला ज्या अपेक्षेने निवडून दिले आहे, त्या अपेक्षांची पुर्तता करण्यासाठी मी पुढील पाच वर्षे प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
मंत्री पदाच्या शर्यतीत नाही
महाडिक म्हणाले, मी मंत्री पदाच्या शर्यतीत नाही. त्यामुळे पक्षश्रेष्टींकडे त्याबाबत कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहणार आहे.