Satara : वडगाव हवेलीत घुमला 'चांगभलं'चा गजर
श्री सिद्धनाथ-जोगेश्वरी रथयात्रा उत्साहात
दुशेरे : वडगाव हवेली (ता. कराड) येथील कुलदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीची रथयात्रा उत्साहात पार पडली. यावेळी उपस्थित भाविकांनी गुलाल-खोबऱ्याची उधळण करत 'सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं'चा एकच गजर केला.
श्रींच्या पालखीची डोंगराकडील मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली. प्रथेप्रमाणे यात्रेचा संपूर्ण मान गावातील बारा बलुतेदार मंडळींना विभागून दिला होता. त्याचबरोबर मंदिराची रंगरंगोटी, सजावट करण्यात आली आहे.
तुळशी विवाहादिवशी मध्यरात्री भाविकांच्या उपस्थितीत सिद्धनाथ व जोगेश्वरी देवांचा विवाह सोहळा झाला. यानंतर शुक्रवार २१ रोजी देवदीपावली दिवशी देवाच्या लग्नाची वरात म्हणजे रथोत्सव पार पडला. सकाळी मानकरी व पुजारी मंडळींनी श्रींच्या मूर्ती सजवलेल्या रथामध्ये विराजमान केल्या. रथाची पूजा व आरती झाल्यानंतर ग्रामप्रदक्षिणेसाठी रथ मंदिररापर्यंत ओढत नेण्यात आला. रथ, पालखी व रथ मंदिर परिसरात नेण्यात आले. यावेळी भाविकांनी गुलाल- खोबऱ्याची उधळण करत श्रींचा जयघोष केला.
वडगाव हवेली रथयात्रा मंदिराजवळ आल्यानंतर भाविकांनी गुलाल-खोबऱ्याची उधळण केली. यात्रेस परिसरातील रेठरे बुद्रुक, कोडोली, दुशेरे, कार्वे, कापील गोंदी गावचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावामधील सर्व देवी-देवतांच्या पालख्या, मानाच्या कावडी, दिवट्यासह परिसरातील हजारो भाविकांनी यावेळी उपस्थिती होती.
यानंतर देवाचा रथ व पालख्या गावाकडे ओढत आणण्यात आला. गावच्या मुख्य वेशीत रथ आल्यानंतर आरती करून रथ प्रदक्षिणेची सांगता करून या ठिकाणी भक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात येतो. हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा उत्साहात पार पडली.