वायूवाहक नौकेने ओलांडली सामुद्रधुनी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या ‘सर्व शक्ती’ या इंधनवायू वाहक नौकेने होमुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे. ती आता भारताकडे येत असून येत्या तीन ते चार दिवसात ती गुजरातमधील बंदरावर पोहचण्याची शक्यता आहे. या नौकेत 45 हजार टन इतका इंधनवायू आहे. भारताची इंधनवायूची प्रतिदिन आवश्यकता साधारणत: 50 हजार टनांची आहे. या नौकेमुळे देशाची एक दिवसाची आवश्यकता भागू शकते.
या नौकेतील इंधन वायूची खरेदी भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने केली आहे, अशी माहिती देण्यात येत आहे. मात्र, या माहितीला अद्याप या कंपनीने दुजोरा दिलेला नाही. तथापि, ही नौका भारताकडेच येत असल्याचा संकेत या कंपनीने दिला आहे. ही नौका भारतीय बंदरावर आल्यास ती अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यानंतर ती ओलांडणारी प्रथम भारतीय नौका ठरणार आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाचा प्रारंभ झाला तेव्हा इराणच्या आखातात भारताच्या 22 इंधन वाहक नौका होत्या. त्यांच्यापैकी बऱ्याचशा आता भारतात परतल्या आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.