For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयआयटीचे अस्वास्थ्य

06:25 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयआयटीचे अस्वास्थ्य
Advertisement

आयआयटी मुंबई येथील वसतिगृहातील 19 वर्षीय विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येमुळे देशातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उच्च दर्जाची शिक्षण पद्धती आणि कडक प्रवेश प्रक्रिया यामुळे आयआयटीसारख्या संस्थांना जगभरात वेगळी ओळख आहे. परंतु, अशा घटनांमुळे मानसिक स्वास्थ्याच्या पातळीवर या संस्था कितपत सक्षम आहेत, याबाबत साशंकता निर्माण झालेली दिसते.

Advertisement

गेल्या काही कालावधीत मुलांच्या आत्महत्यांचे प्रकार वाढत असून ही बाब गंभीर झाली आहे. विविध स्पर्धात्मक परीक्षा असोत की इतर परीक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. आयआयटी मुंबईतील दुसऱ्या वर्षांचा विद्यार्थी असलेल्या साहिलच्या आत्महत्येचे प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. साहिलने वसतिगृहाच्या खोलीत मागच्या शुक्रवारी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आयआयटी प्रशासनाने परीक्षेत गैरप्रकार करताना साहिल सापडल्याचा दावा केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे दिसून येते. मुंबईत आयआयटी विद्यार्थ्यांनी सुरू पेलेले आंदोलन, यवतमाळ येथील साहिलच्या निवासस्थानाबाहेर त्याच्या आजीसह अन्य नातेवाईकांनी न्यायासाठी मांडलेले ठाण तसेच विरोधी पक्षांचा आंदोलनात्मक पवित्रा हा त्याचाच भाग. हे प्रकरण तापल्यानंतर प्रशासनाने प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांची अधिष्ठाता पदावरून उचलबांगडी केली असली, तरी हे प्रकरण अद्याप शांत झालेले नाही. डॉ. डुल्ला यांच्यावरील कारवाईविरोधात आता प्राध्यापकही एकटवलेले दिसतात. त्यांच्या समर्थनार्थ या मंडळींनीही निदर्शने केल्याने विद्यार्थी विरुद्ध प्राध्यापक हा संघर्ष तीव्र झालेला पहायला मिळतो. मागच्या काही दिवसांपासून देशाच्या शिक्षण क्षेत्रात गोंधळाची स्थिती आहे. सीजेपीच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्याचे उदाहरण ताजेच आहे. अशातच आयआयटीसारख्या नावाजलेल्या संस्थांमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचे सांप्रत प्रकरणातून अधोरेखित होते. मुळात साहिलच्या आत्महत्येनंतर आयआयटी प्रशासनाने संयमाची भूमिका घेणे अपेक्षित होते. परंतु, साहिलच कसा दोषी आहे, हेच दाखवण्याचा त्यांचा अप्रत्यक्ष प्रयत्न दिसला. त्यावरून गहजब उठल्यानंतर ‘तपास सुरू असताना तपशील देणे अयोग्य होते,’ असे म्हणत त्यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली असली, तरी त्याला उशिरा सुचलेले शहाणपणच म्हणावे लागेल. खरे तर तपासातून काय ते कळले असते. त्याआधीच संस्थेने संबंधित विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अशा प्रकारची भूमिका मांडणे, हा बेजबाबदारपणाच. मुळात उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी राष्ट्रीय कृती दल कार्यरत आहे. या कृती दलानेच आमहत्यांमागे शैक्षणिक दबाव, जातीय भेदभाव, आर्थिक ताणतणाव, लैंगिक छळ आणि परीक्षांमधील अपयश अशी अनेक कारणे असू शकतात, असे म्हटले आहे. त्याचबरोबर जून 2026 च्या सार्वजनिक करण्यात आलेल्या अहवालात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या हाताळण्यासाठी प्राध्यापकांकडे पुरेसे कौशल्य नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. वास्तविक 90 टक्के प्राध्यापक याबाबत अप्रशिक्षित आहेत. मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणही त्यांना नाही. त्यात संस्थांमध्ये प्राध्यापक मार्गदर्शनाच्या औपचारिक प्रशिक्षणाचीही बोंब आहे. हे काही चांगले लक्षण नव्हे. 2018 ते 2023 या पाच वर्षांत देशभरातील आयआयटीमध्ये 39 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने संसदेत दिली होती. ग्लोबल आयआयटी अल्युमनी सपोर्ट ग्रुपने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 20 वर्षांत 171 विद्यार्थ्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे. त्यापैकी 82 टक्के मृत्यू हे आत्महत्येचे आहे. हे गंभीरच. म्हणून मानसिक आरोग्यविषयक प्रशिक्षण कार्यक्रम व त्यातील प्राध्यापकांचा सहभाग याकडे भविष्यात प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.