निस्सान आणि होंडा यांच्यातला करार संपला
कराराचा कालावधी न वाढविण्याचा दोन्ही कंपन्यांचा निर्णय
वृत्तसंस्था/टोकियो
जपानची वाहन उत्पादक कंपनी निस्सान आणि होंडा यांच्यातील करार आता संपला आहे. दोन्ही कंपन्यांनी तो पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी होंडा आणि निस्सानने विलीनीकरणासाठी सामंजस्य करार (एमओयू) केला होता. जर हा करार झाला तर दोन्ही कंपन्यांचा समूह 60 अब्ज डॉलर्स (सध्याचे मूल्य-सुमारे 5.21 लाख कोटी रुपये) किमतीचा असेल. टोयोटा, फोक्सवॅगन आणि ह्युंडाई नंतर वाहन विक्रीच्याबाबतीत हा जगातील चौथा सर्वात मोठा समूह होता. होंडा निस्सानला त्यांची उपकंपनी बनवू इच्छित होती. वृत्तानुसार, करारातून माघार घेण्याचा पहिला निर्णय निस्सानने घेतला कारण होंडा निस्सानला त्यांची उपकंपनी बनवू इच्छित होती. यामुळे दोघांमधील मतभेद वाढले. ज्यामुळे पुढील वाटाघाटी कठीण झाल्या. या करारातील आणखी एक भागीदार मित्सुबिशी मोटर्सने म्हटले होते की, ते विलीनीकरणाचा विचार करत आहेत.
कंपन्यांनी करार न करण्याचा निर्णय का घेतला?
चीन आणि अमेरिकन बाजारपेठेत विक्री आणि नफ्यात घट झाल्यामुळे कंपन्यांना त्यांचे कर्मचारी आणि उत्पादन क्षमता कमी करावी लागली. काही काळापासून कंपन्यांचा नफाही सुमारे 70 टक्क्यांनी कमी झाला आहे. दोन्ही मोठ्या बाजारपेठांमधील घटता हिस्सा हे कंपन्यांच्या एकत्र येण्याचे मुख्य कारण मानले जात होते. तिन्ही कंपन्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की ते बुद्धिमत्ता आणि इलेक्ट्रीक वाहनांच्या युगात धोरणात्मक भागीदारीद्वारे एकमेकांशी सहयोग करतील. निस्सान आणि होंडाने त्यांच्या उद्योगात बीवायडी सारख्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांची जलद वाढ आणि प्रमुख चिनी बाजारपेठेचा त्यांच्या बाजारपेठेवर परिणाम झाल्याचे पाहिले आहे. याशिवाय, दोघांनाही अमेरिकेकडून शुल्क लादले जाण्याची भीती आहे.
उत्पादन क्षमता करणार कमी
वृत्तानुसार, निस्सानला चीनमध्ये आपली क्षमता कमी करावी लागेल. कंपनी डोंगफेंग मोटरसोबतच्या संयुक्त उपक्रमाद्वारे येथे आठ कारखाने चालवते. कंपनीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी निस्सानने यापूर्वी चांगझोऊ प्लांटमधील उत्पादन थांबवले आहे.
निस्सानचा शेअर घसरला, होंडाचा वाढला
करार न होण्याच्या बातमीनंतर निस्सान मोटरचे शेअर्स शेअरबाजारात गुरुवारी 0.34 टक्क्यांनी घसरले. दरम्यान, होंडा मोटरचे शेअर्स 2.14 टक्क्यांनी वाढून 1,434 वर बंद झाले. यापूर्वी, 17 डिसेंबर रोजी विलीनीकरणाच्या चर्चेची पहिली बातमी आल्यानंतर, डिसेंबरच्या अखेरीस निस्सानचे शेअर्स 60 टक्केपेक्षा जास्त वाढले होते.