Ichalkaranji protest | इचलकरंजीत यंत्रमागधारकांचे आंदोलन चिघळले; वाहने रोखल्याने चंदूर मार्गावर तणाव
चंदूर-इचलकरंजी मार्गावर आंदोलनामुळे वाहतूक ठप्प
इचलकरंजी : खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीच्या आंदोलनाने शुक्रवारी तीव्र स्वरूप धारण केले. चंदूरहून इचलकरंजीकडे येणारी कापड वाहने आंदोलनकर्त्यांनी अडवून धरली. तर काही टेम्पोंच्या चाकातील हवा सोडल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे इचलकरंजी-चंदूर मार्गावरील वाहतूक तीन ते चार तास विस्कळीत झाली होती.
गेल्या १७ दिवसांपासून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचे मजुरीवाढीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र ट्रेडिंग असोसिएशनने अद्यापही ठोस भूमिका घेतली नसल्याने आंदोलन अधिक आक्रमक होत चालल्याचे चित्र आहे. अनेक कारखान्यांतील बिमे कापण्यात आल्याने उत्पादन ठप्प होऊन आर्थिक नुकसान वाढत आहे.
प्रांताधिकाऱ्यांनी दोन वेळा बैठका घेतल्या. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतर यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेऊन मध्यस्थीची मागणी केली होती. येत्या दोन दिवसांत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
दरम्यान, शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात कापड ट्रेडिंग पेढ्यांकडे पाठविले जात होते. कामगारांचे पगार व इतर आर्थिक व्यवहारही याच दिवशी होत असल्याने आंदोलनकर्त्यांनी ही वेळ निवडत चंदूर परिसरात वाहने रोखून आंदोलन केले.
यावेळी काही वाहनचालक व आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक वादही झाले. आमचा तुमच्याशी वाद नाही, ट्रेडिंग असोसिएशनच्या मालकांपर्यंत आमचा संदेश पोहोचवा, असे आंदोलनकर्त्यांनी चालकांना सांगितले. अखेर सायंकाळच्या सुमारास आंदोलन स्थगित करण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत सुरू झाली. दरम्यान, आंदोलनाला लवकर तोडगा न निघाल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.