For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समदृष्टीच्या माणसाचे व्यवहार इतरांप्रमाणेच चालू असतात

06:22 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
समदृष्टीच्या माणसाचे व्यवहार इतरांप्रमाणेच चालू असतात
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

मन स्थिर करणे हेच आयुष्याचे ध्येय असल्याने त्यांनी संसाराला जिंकले असे म्हणता येईल. ह्या अर्थाचा

इथे चि जिंकिला जन्म समत्वी मन रोवुनी । निर्दोष सम जे ब्रम्ह झाले तेथे चि ते स्थिर ।।19।।

Advertisement

हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार ज्याचे मन समत्वी स्थिर झालेले असते, त्याला सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे ब्रह्म आपणच आहोत ह्याची जाणीव असते. जेव्हा इतर वस्तू ह्या परब्रम्हापेक्षा गौण आहेत हे लक्षात येते तेव्हा माणसाला आपोआपच इतर वस्तूंची इच्छा होत नाही परंतु ह्याकडे लक्ष न देता समदृष्टी होण्यासाठी कित्येक लोक मुद्दामहून विषयाच्या इच्छेचा त्याग करतात, इंद्रियांना रोखून धरतात पण त्यांच्या मनात विषयसुखाचे विचार रेंगाळत असल्याने विषय त्यांच्या डोक्यात घर करून राहतात. त्याउलट ज्यांना कायम टिकणाऱ्या सुखाची गोडी काय आहे हे समजलेले असते आणि त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे ह्याची जाणीव असते त्यांना विषयसुखाची इच्छा होत नाही. त्यांनाही संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण असल्याने ते प्रारब्धानुसार वाट्याला येणारे विषयसुख भोगतात परंतु त्यातून आपल्याला आणखीन विषयसुख भोगायला मिळावे अशी इच्छा त्यांना कधी होत नाही. त्यामुळे त्यांनी वाट्याला आलेले विषयसुख जरी भोगले तरी ते त्यापासून अलिप्त असतात. अष्टावक्र आणि जनक ह्यांच्यातील संवादातून ही गोष्ट उलगडत जाते. अष्टावक्रगीतेत असा प्रसंग आहे की, अष्टावक्रमुनी जनक राजाला विचारतात की, तुला आत्मज्ञान झाले आहे असे म्हणतोयस तर तू सोन्याच्या सिंहासनावर का बसला आहेस? सोन्याच्या ताटात का जेवतो आहेस? एव्हढा राणी परिवार का बाळगतो आहेस? एखादा मनुष्य मुनींचा प्रश्न ऐकून गडबडून गेला असता परंतु आत्मज्ञानी जनकमहाराजांनी त्याचे योग्य उत्तर दिले. ते म्हणाले, हे सर्व मी प्रारब्धानुसार वाट्याला आलेले आहे म्हणून उपभोगतो आहे पण मला ह्याची बिलकुल हाव नाही. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, तुमच्या नशिबाने मिळालं असेल तर खुशाल गाद्यावर लोळा, रोज श्रीखंडपुरी खा पण उद्या जर हे नसेल तर हळहळू नका. माउली आपल्याला तेच सांगत आहेत, ते म्हणतात, आपणहून कशाची इच्छा करू नका म्हणजे तुम्ही ह्या सगळ्यापासून अलिप्त व्हाल तसे झालात की, मानसिक शांतता मिळेल. माउली पुढे म्हणतात, तुम्ही अशा निरिच्छ लोकांना शोधायला गेलात तर तुम्हाला ते सहजी सापडणार नाहीत कारण त्यांचे व्यवहार जगातील इतर लोकांप्रमाणेच चालू असतात. फरक एव्हढाच इतर लोकांच्यावर अज्ञानाचे पांघरूण असल्याने ते त्या व्यवहारात स्वत:ला गुंतवून घेतात आणि त्यामुळे त्यांना त्याचे सुखदु:ख भोगावे लागते. निरिच्छ व्यक्तीला आत्मज्ञान झाल्याने तो ह्या सगळ्यापासून अलिप्त राहत व्यवहार करतो. असा मनुष्य भेटावा म्हणजे त्याचा आदर्श घेऊन आपल्यालाही त्याच्याप्रमाणे समदृष्टी प्राप्त करून घेता येईल असे वाटणे साहजिक. परंतु असा मनुष्य चटकन ओळखू येत नाही कारण त्याला समदृष्टी प्राप्त झाली आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.