वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी रस्त्याची अक्षरशः चाळण
वारंवार निवेदने देऊनही प्रशासन उदासीनच
वार्ताहर/कुडाळ
कुडाळ-वेंगुर्ले तालुक्याला जोडणाऱ्या वेतोरे सबस्टेज ते तेंडोली आदोसेवाडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत, की खड्यात रस्ता हेच वाहनचालकांना कळत नाही. पावसामुळे सध्या हा रस्ता चिखलमय झाला असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे. ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली. मात्र प्रशासन आजपर्यंत उदासीनच असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. या रस्त्याची डागडुज्जी करण्याची मागणी होत आहे.कुडाळ-वेंगुर्ले तालुक्याला जोडणारा वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी हा सहा किलोमीटर रस्ता सतरा-अठरावर्षापूर्वी करण्यात आला होता. त्यामुळे सध्या हा रस्ता पूर्णता खराब झाला आहे. या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाला अनेकदा ग्रामस्थांनी निवेदने दिली. मात्र अद्यापपर्यंत कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.सध्या या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. रस्त्यावरील खड्डी उखडली आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एखाद्यावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावरील खड्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे बऱ्याचदा वाहने चालविताना खड्यातील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडते. त्यामुळे पादचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातो.तेंडोली-आदोसेवाडी या भागात मोठी लोकवस्ती आहे. या भागातील लोकांची या रस्त्यावरुन सतत रहदारी सुरु असते. या मार्गावरून एसटी वाहतूकही सुरु आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्वाचा मार्ग असून कुडाळ-वेंगुर्लेला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग आहे. शालेय विद्यार्थ्यांचीही या मार्गावरून ये-जा सुरु असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. ग्रामस्थांनी स्वखर्चातून या रस्त्याची साफसफाई केली होती. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस मोकळा झाला.मात्र रस्त्यावरील खड्डयामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे.गेल्या तीन-चार वर्षापासून या मार्गाचे डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.