For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूरस्थितीला सामोरे जाण्यास प्रशासन सज्ज

11:06 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
पूरस्थितीला सामोरे जाण्यास प्रशासन सज्ज
Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन : जिल्ह्यात धोक्याची स्थिती नाही

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस होत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. असे असले तरी परिस्थिती धोक्याच्या बाहेर असून पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. घटप्रभा, मलप्रभा व कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. या नद्यांच्या खोऱ्यामध्ये येणाऱ्या भागांचा दौरा करण्यात आला आहे. संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार व जिल्हा पोलीसप्रमुखांशी चर्चा करून सुरक्षेच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास पुराच्या विळख्यात सापडणाऱ्या नागरिकांसाठी 420 पेक्षा अधिक काळजी केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. त्याठिकाणी नागरिकांच्या वास्तव्यासह इतर सुविधा पुरविण्याची व्यवस्था केली आहे.

खानापूर तालुक्यामध्ये पाऊस अधिक प्रमाणात कोसळत असून 13 पूल पाण्याखाली गेले आहेत. यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात येत आहे. कुसमळी पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अहवालानुसार सदर पुलावरून अवजड वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. हिडकल जलाशयामध्ये सध्या 32 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. खानापूर तालुक्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अनेक घरांची पडझड झाल्याचे समजते. यासाठी एसडीआरएफच्या नियमानुसार भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यानुसार भरपाई दिली जाईल. राज्य सरकारकडून मार्गसूची जारी केल्यानंतर ती भरपाई दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी आपण कारवार येथे सेवा बजावताना पूरस्थिती नियंत्रणाचा चांगलाच अनुभव आहे. त्यानुसार येथील पूरस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची तयारी केली जात आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून तेथील पावसाचा अंदाज घेतला जात आहे. त्यानुसार उपाययोजना राबविल्या जात आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.