बहराइच हिंसाचारप्रकरणी योगी सरकारची कारवाई तीव्र
वृत्तसंस्था/ बहराइच
उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर भूमिका घेतली आहे. सीओ ऊपेंद्र गौर यांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी महसी पोलीस स्थानकाचे प्रभारी आणि हरदी पोलीस ठाण्याचे एसओ यांना निलंबित करण्यात आले आहे. बहराइचला गेलेले एडीजी कायदा आणि सुव्यवस्था अमिताभ यश लखनौला परतले असून ते लवकरच आपला अहवाल डीजीपींना सादर करणार आहेत. त्याआधारे काही अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बहराइच हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 50 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी 10 आरोपींविऊद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी सहा जणांची नावे समाविष्ट असून उर्वरित अज्ञात आहेत. याआधी मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंसाचारात मृत झालेल्या राम गोपाल मिश्रा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पीडितेचे कुटुंब महसीचे आमदार सुरेश्वर सिंह यांच्यासह मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे आश्वासन कुटुंबीयांना दिले. गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री योगी यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर ते समाधानी आहेत. आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास संपूर्ण कुटुंबाला आहे.