इस्रायली लष्कराची कारवाई तीव्र
24 तासात 200 जणांचा मृत्यू; हमासच्या बोगद्यांवर हवाई हल्ले
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल आणि हमास यांच्यात हिंसक संघर्ष सुरूच आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली लष्कराने (आयडीएफ) हमासचे दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी हल्ले तीव्र केले आहेत. एका अहवालानुसार, गाझा पट्टीतील खान युनिस येथील हमासच्या बोगद्यांवर गेल्या 24 तासांत 200 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सच्या (आयडीएफ) सैनिकांनी दक्षिणेकडील शहरात आक्रमण करत हमासच्या बोगद्यांवर हवाई हल्ले केले. यासोबतच तोफांचे गोळेही डागण्यात आले.
इस्रायली रणगाड्यांनी शुक्रवारी रात्री गाझा पट्टीतील खान युनिसवर जोरदार गोळीबार आणि हवाई बॉम्बफेक केली. इस्रायली मोहिमेत 24 तासांत जवळपास 200 लोक मारले गेल्याची नोंद आहे. विमानांनी मध्य गाझामधील नुसीरत पॅम्पवर अनेक हवाई हल्ले केल्याचे इस्रायली सैन्याच्या कारवाईबाबत स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू
अडीच महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धादरम्यान गाझातील 2.3 दशलक्ष लोक सुरक्षित आश्र्रयस्थानाच्या शोधात घर सोडून पळून गेले आहेत. गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत इस्रायलच्या हल्ल्यात 187 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तसेच 7 ऑक्टोबरपासून मृतांची संख्या 21,507 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार गाझाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास एक टक्का लोकसंख्या नष्ट झाली आहे.