नाते तोडण्याचे काम
जोडीदारासोबत ब्रेकअप करू शकत नसल्यास. कंपनी करणार तुमच्या वतीने बोलणी
कुठल्याही नात्याची सुरुवात करणे सोपे असू शकते, परंतु ते समाप्त करणे अनेकदा सर्वात अवघड काम असते. अनेक लोक थेट बोलण्याऐवजी अचानक फोन कॉल घेणे बंद करतात, मेसेजला उत्तर देत नाहीत आणि काही न सांगता नाते समाप्त करतात, याला आजच्या काळात ‘घोस्टिंग’ म्हटले जाते. आता याच समस्येला हाताळण्यासाठी डेटिंग प्लॅटफॉर्म डेटिंग डॉट कॉमने एक अनोखी नोकरी काढली असून ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
चीफ ब्रेकअप ऑफिसर
कंपनी चीफ ब्रेकअप ऑफिसरची भरती करत आहे. या पदावर निवडण्यात आलेल्या व्यक्तीचे काम अशा लोकांच्या वतीने त्यांच्या जोडीदारांना नाते आता संपुष्टात आल्याचे सांगणे आहे. म्हणजेच एखादा व्यक्ती स्वत: ब्रेकअपबद्दल बोलू शकत नसेल तर चीफ ब्रेकअप ऑफिसर त्याच्या वतीने हे अवघड संभाषण करणार आहे.
नोकरीत काय करावे लागणार?
कंपनीनुसार या नोकरीत केवळ ‘ब्रेकअप’ बोलणे पुरेसे नसेल. निवडलेल्या व्यक्तीला समोरच्या इसमासोबत सन्मानजनक आणि संवेदनशील पद्धतीने बोलावे लागणार आहे. तसेच प्रकरण सामान्य होते, गुंतागुंतीचे होते का पूर्णपणे बिघडलेल्या अवस्थेत पोहोचले होते हे निश्चित करावे लागणार आहे.
कुणाला मिळणार नोकरी
डेटिंग डॉट कॉमनुसार कमीतकमी तीन ब्रेकअपचा अनुभव घेतलेल्या उमेदवारांना प्राथमिकता मिळणार आहे. तसेच त्यांना रिलेशनशिप, सिच्युएशनशिप आणि ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ यासारख्या नात्यांमध्ये काय फरक असतो हे माहित असायला हवे. याचा उद्देश ‘घोस्टिंग’च्या वाढत्या समस्येला कमी करणे असल्याचे कंपनीचे सांगणे आहे.
डेटिंग डॉट कॉमने एका अध्ययनाचा दाखला देत जेन झी आणि मिलेनियल्सचे 84 टक्के लोक स्वत:च्या जीवनात कधी न कधी घोस्टिंगचे शिकार ठरल्याचा दावा केला आहे. कंपनीचे डेटिंग एक्सपर्ट जेमी ब्रॉनस्टीन यांच्यानुसार आज लोक अवघड संभाषणाला टाळू इच्छितात. तंत्रज्ञानाने लोकांसाठी कुणाला काही न सांगाता सोडून देणे सोपे पेले आहे, परंतु कुठल्याही नात्याची अखेर सन्मान आणि प्रामाणिकपणे व्हायला हवी.
लोकांच्या प्रतिक्रिया
या नोकरीच्या जाहिरातीनंतर इंटरनेटवर यासंबंधी चर्चा रंगू लागली आहे. जर यामुळे कुणाला सन्मानजक पद्धतीने नात्यामधून बाहेर पडण्यास मदत मिळत असेल तर हा चांगला विचार असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. तर जर कुठलाही व्यक्ती स्वत: स्वत:च्या जोडीदारासोबत ब्रेकअप देखील करु शकत नसेल तर त्याने नाते सुरूही करू नये असे अनेक युजर्सचे सांगणे आहे. आता ब्रेकअप देखील आउटसोर्स होऊ लागला असे एका इसमाने नमूद पेले आहे. आता पुढील नोकरी बहुधा ‘सॉरी बोलणाऱ्या अधिकाऱ्या’ची येईल असे एका युजरने थट्टेच्या सुरात म्हटले आहे.
बदलतेय डेटिंगचे जगत
नाते निभावणे आणि समाप्त करण्याची पद्धत वेगाने बदलत आहे. घोस्टिंग, सिच्युएशनशिप आणि आता चीफ ब्रेकअप ऑफिसर यासारख्या गोष्टी डिजिटल युगात डेटिंगचे जगत पूर्वीपेक्षा खूप बदलल्याचे सांगत आहेसत. याचमुळे डेटिंग डॉट कॉमची ही अनोखी नोकरी जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. हे केवळ मार्केटिंग स्टंट नव्हते. लिंक्डइनवर या पदाची अधिकृत जॉब पोस्टही दाखविण्यात आली आहे, ज्यात ही अमेरिकेत स्थित नोकरी असल्याचे नमूद आहे. दोन आठवड्यांमध्ये या पदाकरता 26 जणांनी अर्ज केले आहेत. सध्या कंपनीने अर्ज स्वीकारणे थांबविले आहे.