आरोपी प्रियकर नव्हे तर होता रुममेट
निकिताच्या पित्याचा खुलासा
वृत्तसंस्था/ हैदराबाद
अमेरिकेत घडलेल्या एका घटनेने भारतातील लोकांनाही मोठा धक्का बसला आहे. मेरीलँडच्या कोलंबियात राहणारी 27 वर्षीय भारतीय युवती निकिता गोडिशाला हिची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. हे कृत्य तिचा पूर्वाश्रमीचा रुममेट अर्जुन शर्माने केल्याचे पोलिसांचे मानणे आहे. हत्येनंतर तो निकिता बेपत्ता असल्याचे सांगून भारतात पळून आला होता.
निकिताचा मृतदेह 3 जानेवारी रोजी अर्जुनच्या अपार्टमेंटमधून हस्तगत करण्यात आला होता. मृतदेहावर चाकूच्या घावाच्या अनेक खुणा होत्या. अर्जुनने 2 जानेवारी रोजी निकिता बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. परंतु त्याच दिवशी त्याने भारतासाठी फ्लाइट पकडली होती.
अर्जुन हा निकिताचा एक्स बॉयप्रेंड नव्हता, तर तिचा पूर्वाश्रमीचा रुममेट होता. चार जण एकत्रित अपार्टमेंटमध्ये राहत होते. अर्जुनने निकिताकडून रक्कम उधारीवर घेतली होती. निकिताने ही रक्कम मागितल्यावर अर्जुनने तिची हत्या करत भारतात पळ काढल्याचा दावा निकिताचे पिता आनंद गोडिशाला यांनी केला आहे. हा प्रेमसंबंधांचा प्रकरण नसून अर्जुन हा अनेक लोकांचे पैसे देणे होता आणि निकिताकडूनही त्याने मोठी रक्कम घेतली होती असे गोडिशाला यांचे सांगणे आहे.
अर्जुनने हत्येच्या काही दिवसांपूर्वी निकिताकडून 4500 डॉलर्स घेतले होते, यातील 3500 डॉलर्स त्याने परत केले होते. परंतु मग त्याने पुन्हा 1 हजार डॉलर्स मागितले असता निकिताने ते देण्यास नकार दिला होता. निकिताची चुलत बहिण सरस्वती गोडिशालाने अमेरिकेतील भारतीय दूतावासात याविषयी तक्रार नोंदविली आहे.