Sangli News | खाते तुमचे, सह्या दुसऱ्याच्या आणि पैसे तिसऱ्याचेच! पतसंस्थेचा अजब कारभार
सांगली मिरज तालुक्यातील समडोळी कर्मवीर बिगर शेती सहकारी पत संस्थेत आर्थिक घोटाळा
सांगली : मिरज तालुक्यातील समडोळी गावातील कर्मवीर बिगर शेती सहकारी पत संस्थामध्ये एक गंभीर आर्थिक घोटाळा समोर आला आहे. काही नागरिकांच्या खोट्या कागदपत्रांद्वारे आणि सह्या वापरून कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावावर लाखोंची कर्जे उचलली, पण त्यांचा परतावा झालेला नाही. या प्रकरणामुळे संबंधित नागरिकांना आता वसुली आणि जप्तीच्या नोटीसा येत आहेत.
सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वप्निल नायकू मस्कर यांनी तक्रार दिल्यानंतर, पोलीसांनी त्वरित कारवाई करत पिग्मी एजंट प्रवीण नायकू मस्कर, सेक्रेटरी जयपाल भोपाल ढोले, व चेअरमन प्रदीप आदाप्पा खोत यांच्या विरोधात कलम 420, 465, 468 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. ए. तळेकर म्हणाले, “हा प्रकार खूप गंभीर असून आम्ही त्वरित कारवाई करत आहोत. पतसंस्थेची सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपी सध्या फरार आहेत, मात्र लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल. तसेच गावात अशा प्रकारची फसवणूक इतर नागरिकांनाही झाल्यास त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.” स्थानिक नेते महेंद्र चंडाळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले असून, नागरिकांचे हक्क राखण्यासाठी आणि अशा फसवणुकीवर कठोर कारवाई होण्याची मागणी केली आहे.